टाटा सन्सने एअर इंडिया खरेदी केल्याचे वृत्त केंद्राने फेटाळले


नवी दिल्ली – टाटा समूहाकडून एअर इंडियासाठी सर्वाधिक बोली लागल्याचे सांगितले जात होते. आज सकाळीच त्यापाठोपाठ एअर इंडियावर टाटा समूहाची मालकी प्रस्थापित होणार असल्याचे वृत्त सर्वच माध्यमांमध्ये झळकले होते. हे वृत्त एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेले असताना या वृत्ताचे केंद्र सरकारकडून खंडन करण्यात आले आहे. टाटा समूहाची मालकी प्रस्थापित झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याची भूमिका केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नेमका व्यवहार झाला की नाही? या चर्चेवर पडदा पडला आहे.


पुन्हा एकदा एअर इंडियाची मालकी देशातील टाटा सन्सकडे आल्याचे वृत्त आज सकाळी समोर आले होते. चार निविदा एअर इंडियावरील मालकी हक्कासाठी आल्या होत्या. त्यामध्ये टाटा सन्ससोबत स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे देखील स्पर्धेत होते. पण, यात टाटा सन्सने बाजी मारली असून आता टाटा समूहाकडे एअर इंडियाची मालकी गेल्याचे सांगितले जात होते. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली होती. केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रीगटाने एअर इंडियाची मालकी टाटा सन्सकडे सोपवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती देखील देण्यात आली होती.

दरम्यान, केंद्रीय प्रसिद्धी विभागाने दुपारच्या सुमारास ट्विटरवर यासंदर्भात खुलासा केला आहे. एअर इंडियासाठी लावण्यात आलेली बोली केंद्र सरकारने स्विकारल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. पण, हे वृत्त चुकीचे असून जेव्हा तसा निर्णय घेतला जाईल, तेव्हा केंद्र सरकारकडून कळवण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.