
मुंबई – आज गोवा दौऱ्यावर शिवसेना खासदार संजय राऊत निघाले असून गोव्यातून शिवसेना निवडणूक लढवणार असल्यामुळे आपण तिकडे चाललो असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. तिकडे बाळासाहेब ठाकरेही प्रचारासाठी गेले होते. गोव्यात आम्ही जिंकलो जरी नसलो, तरी तिकडे आमचे संघटन असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले. त्याचबरोबर भाजप कोणावर तरी दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राऊत यांनी यावेळी बोलताना केला.
शिवसेना गोवा विधानसभेच्या २२ जागांवर निवडणूक लढवणार – संजय राऊत
राऊत आज माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी उद्धवजींच्या सांगण्याप्रमाणे आता गोव्याला निघालो आहे. आम्ही तिकडे २२ जागांवर लढू. आज संपूर्ण गोव्याला अंमली पदार्थांचा विळखा पडलेला आहे. गोव्यात कॅसिनोचा, जुगाराचा कहर आहे. त्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करतच भाजप तिकडे सत्तेवर आली. पण त्या सगळ्याला आज भाजपचाच पाठिंबा आहे. कोरोनाकाळात गोव्याची अवस्था वाईट झाली आहे. ड्रग्समाफियांच्या ताब्यात गोवा अडकला आहे. भाजप फारच थापा मारत आहे. त्यासाठी तिकडे जाणे गरजेचे आहे.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात आम्ही कोणताही पक्ष फोडला नाही. भारतीय जनता पक्ष आज कोणाला तरी फोडायचा प्रयत्न करत आहे. ते ईडी, सीबीआयच्या माध्यमातून कोणावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे महाराष्ट्र आणि गोव्याची तुलना करता येणार नाही. गोव्यात भाजपने अनेकदा तोडफोड करत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची जनतेची इच्छा आहे आणि ते शिवसेनाच करु शकते. गोव्यात आमचे प्राबल्य आहे. कोणासोबत युती किंवा आघाडी झाली तर ठीक, नाहीतर आमचे आम्ही लढू.
