सूर्यकुमार आणि इशान किशनला ब्रायन लाराचा सल्ला


नवी दिल्ली – इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जवर सहा गडी आणि सहा चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासहीत पाच वेळा स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबईच्या संघाने प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. मुंबईचे तीन सामने शिल्लक असून उर्वरित तिन्ही सामने जिंकल्यानंतर त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित मानला जात आहे.

दरम्यान सध्या वर्ल्ड कप टी-२० संघात स्थान मिळालेल्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. वर्ल्डकपसाठी निवड झाल्यामुळे सूर्यकुमार यादव आणि इशान किशनला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळताना धावांची भूक दिसत नसल्याचे वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा माजी खेळाडू ब्रायन लाराने म्हटले आहे.

ब्रायन लाराने सूर्यकुमार यादव आणि इशान किशन सध्या आक्रमक दिसत नसल्याचे सांगताना पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबईने पुन्हा एकदा प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी या दोघांनी फॉर्ममध्ये येण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. सध्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशनची खेळी चिंतेचा विषय ठरत आहे. मुंबई इंडियन्सचे महत्त्वाचे खेळाडू मानले जाणारे सूर्यकुमार आणि इशान मोठी खेळी करण्यात अयशस्वी ठरत आहेत.

पुन्हा एकदा आयपीएलला युएईमध्ये सुरुवात झाल्यापासून सूर्यकुमार यादव एकदाही दोन अंकी धावसंख्या करु शकलेला नाही. श्रीलंकेत चांगल्या फॉर्ममध्ये असणारा सूर्यकुमार यादव यावेळी चार सामन्यांमध्ये ०,८,५,३ एवढ्याच धावा करु शकला आहे. मुंबई इंडियन्सने मंगळवारी खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या इशान किशनला पंजाबविरोधातील सामन्यात विश्रांती दिली. सूर्यकुमारला संधी देण्यात आली होती, पण रवी विष्णोईच्या गुगलीवर तो शून्यावरच बाद झाला.

मूळ समस्या भारतीय संघात झालेली निवड असू शकते. यामुळेच अनेक खेळाडू माघार घेत शांत बसले असावेत, असे ब्रायन लाराने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले. भारतीय संघ जास्त महत्वाचा असू शकतो. पण येथे तुमचे ब्रेड आणि बटर आहे. आयपीएलमध्ये खेळूनच तुम्हाला ही संधी मिळाली आहे. सूर्यकुमार, इशान किशन आणि तिवारीकडे पाहिले असता, तो त्यांच्यापेक्षा जास्त धावांसाठी भुकेला दिसतो, असे त्याने सांगितले आहे.

या लोकांनी अजून थोडे प्रोफेशनल होण्याची गरज असून आपल्या संघाला स्पर्धेत टिकवून ठेवले पाहिजे. वर्ल्ड कप विसरा, मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा स्पर्धेत आणणे तुमचे काम असल्याचे ब्रायन लाराने म्हटले आहे.