जगातील सर्वात जुनी द्राक्षवेल आहे ५०० वर्षाची

आज भारतासह अनेक देशात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष शेती केली जाते आणि द्राक्षापासून बनणाऱ्या वाईनचा उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. मात्र द्राक्षाचा वेल किती जुना असू शकेल असे कुणाला विचारले तर चटकन सांगता येणार नाही. जगातील अनेक महत्वपूर्ण घटनांचा साक्षीदार असलेली जगातील सर्वात वयोवृद्ध वेल ५०० वर्षाची आहे हे अनेकांना माहिती नसेल.

सेंट्रल युरोप मधील स्लोवानिया देशात मारीबोर शहरात ही वेल आहे. १५७० साली ती होती पण त्यापूर्वीच कधीतरी ती लावली गेली असावी असे सांगितले जाते. विशेष म्हणजे आजही या वेलीला द्राक्षे येतात आणि या वेलीच्या नावाने जगातील एकमेव संग्रहालय आहे. त्याचे नाव ‘ द ओल्ड वाईन हाउस’ असे आहे. या ऐतिहासिक इमारतीच्या चारी बाजूने या वेलीचा विस्तार झालेला आहे.

या वेलीपासून दरवर्षी ३५ ते ५५ किलो द्राक्षे मिळतात आणि त्यापासून १५ ते ३५ लिटर वाईन तयार केली जाते. पाव लिटरच्या बाटल्यात भरून तिची विक्री होते. प्रसिद्ध आर्टिस्ट ऑस्कर कोगोज याने या बाटल्या खास डिझाईन केल्या आहेत. वर्षाला अश्या साधारण १०० बाटल्या विकल्या जातात तर त्यातील काही स्पेशल प्रोटोकॉल म्हणून गिफ्ट दिल्या जातात. ही द्राक्षे झमेटोव्हका जातीची आहेत.

ओल्ड वाईन हाउस मध्ये ही वेल लावली गेली तेव्हा तुर्की साम्राज्याने येथे हल्ला केला होता. या वेलीने अनेक लढाया पहिल्या. येथे मोठी आग लागली तेव्हा आजूबाजूचा परिसर जळून गेला पण वेलीला नुकसान पोहोचले नाही. इतकेच नव्हे तर दुसऱ्या महायुद्धात या शहरावर बॉम्बफेक झाली तेव्हा शहराचा मोठा भाग नष्ट झाला पण वेल त्यातूनही तगून राहिली. या वेलीची वाईन बाटली दलाई लामा, बिल क्लिंटन, पोप जॉन पॉल द्वितीय, अभिनेता ब्रॅड पिट यांना भेट म्हणून दिल्या गेल्या आहेत. ही वाईन मैत्री, सहकार्याचे प्रतिक मानली जाते.