‘सीरम’ला केंद्राची ७-११ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरण चाचणीला परवानगी


नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधक लस उत्पादक कंपनी सीरमला भारतातील केंद्रीय औषध नियंत्रण विभागाने ७ ते ११ वयोगटातील मुलांनाही लसीकरण चाचणीत सहभागी करून घेण्यासाठी परवानगी दिली आहे. भारतातही सध्या लहान वयोगटातील मुलांनाही कोरोनापासून सुरक्षित करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. ही लसीकरण चाचणीची परवानगी त्या पार्श्वभूमीवरच देण्यात आली आहे.

केंद्रीय औषध नियंत्रण संस्था सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेनच्या तज्ज्ञांच्या समितीने म्हटले आहे, समितीने सविस्तर चर्चेनंतर नियमांप्रमाणे वयवर्षे ७ ते ११ वयोगटातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या चाचणीत सहभागी करुन घेण्याची परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे याआधीच सीरमने १२ ते १७ वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण चाचणीला सुरुवात केलेली आहे. यात आता ७ ते ११ वयोगटाचाही समावेश झाल्यामुळे या वयोगटातील मुलांना कोरोना लस मिळण्याचा मार्ग लवकरच मोकळ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

१२ ते १७ वयोगटातील लसीकरण चाचणीच्या १०० सहभागींचा अहवाल सीरमने केंद्राच्या औषध विभागाला सादर केलाय. लवकरच यावर माहिती देण्यात येईल. भारतात सध्या तरी केवळ झायडस कॅडिलाच्या डीएनएवर आधारीत कोरोना विरोधी लसीला आपत्कालीन वापराची परवानगी मिळाली आहे. ही लस १२ वर्षांवरील मुलांना देता येते.