पुण्यातील नव्या बॅनरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा


“कात्रजचा खून झाला!” असा मजकूर असलेला एका मोठा बॅनर पुण्यातील कात्रज परिसरात लावण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावरून या बॅनरचे फोटो सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर, शहरात जोरदार चर्चा रंगली आहे. तर नेमका कोणी हा बॅनर लावला? ही माहिती अद्यापपर्यंत पोलिसांना मिळाली नसल्याची देखील माहिती समोर आली आहे.

मागील काही दिवसात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सविता भाभी, शिवडे आय लव्ह यू… अशा बॅनर लागले गेले होते. तेव्हा देखील या बॅनरबाजीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. तर, आता देखील पुण्यातील कात्रज परिसरातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पासून अंतरावर कात्रजचा खून झाला! अशा आशयाचा मोठा बॅनर झळकला आहे.

आज सकाळपासुन सोशल मीडियावर या बॅनरचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. कात्रज रस्त्याची सतत होणारी कामे, या भागातील विकास कामांकडे दुर्लक्ष, या प्रश्नावरून कात्रजचा खून झाला असल्याचे सांगण्यासाठी व लक्ष वेधण्यासाठी हा बॅनर लावला गेला असावा, असा देखील काहींनी अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, पोलिसांना या बॅनरबाबत विचारले असता, हा बॅनर नेमका कोणी लावला, हे अद्याप माहिती नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.