मुंबै बँकेची बदनामी करणाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात १ हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल


मुंबई – राज्यातील मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँक ही प्रगत आणि उत्तम बँक आहे. कारण आम्ही १२०० कोटींच्या टप्प्यावरून १० हजार कोटींवर मुंबै बँक मेहनतीने आणली. मुंबईच्या सहकाराचे हे वैभव आहे. दुर्दैवाने काही जणांकडून या लौकिकास काळीमा फासण्याचे काम झाले आहे. त्यामुळे बँकेच्या संदर्भात कोणीही उठसूट वाटेल ते स्टेटमेंट देईल, हे अयोग्य असल्यामुळे बँकेने कालच मुंबई उच्च न्यायालयात १ हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते व मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी आज दिली.

दरेकर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेला येथपर्यंत आणण्यात अनेक माजी अध्यक्ष, संचालक आदींचे योगदान आहे. हे मुंबईच्या सहकाराचे वैभव आहे. पण बँकेला काळिमा फासण्याचे काम सर्व टप्प्यावर होत आहे. आमची राजकीय बदनामी करा, वैयक्तिक बदनामी करा, परंतु एका आर्थिक संस्थेची बदनामी झाल्याचा परिणाम त्यांचे ग्राहक, डिपॉझिटर्स यांच्यावर होतो.

हजारो लोकांचे पोट या बँकेवर अवलंबून असते. बँक एखाद्या बातमी अथवा एखाद्या स्टेटमेंटमुळे अडचणीत आली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? म्हणून मुंबै बँकेच्या बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात सूट नंबर २१९०९ आणि सूट नंबर २१९३५ या नोंदणी क्रमांकप्रमाणे दावा दाखल केला आहे. बॅंकेची नाहक बदनामी करणा-यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी आम्ही न्यायालयात केल्याची माहिती दरेकर यांनी यावेळी दिली. आम्ही सव्वा रुपया वगैरेचा नाही, तर १ हजार कोटीचा दावा दाखल केल्याचा टोलाही दरेकर यांनी यावेळी लगावला.