नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिला पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा!


अमृतसर – पंजाबमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडी थांबण्याचे नावच घेत असल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी राजीनामा सोपवलेला असताना, आता पुन्हा एकदा पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

सिद्धू यांनी राजीनामा जरी दिलेला असला तरी देखील त्यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सिद्धू यांनी पत्र पाठवलेले आहे. सिद्धू सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, माणसाचे चारित्र्य तडजोडी करण्यापासून ढासळण्यास सुरूवात होते. पंजाबचे भवितव्य व पंजाबच्या कल्याणासाठीच्या योजना यावर मी तडजोड करणार नसल्यामुळे पंजाबच्या प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचा मी राजीनामा देत आहे.

पंजाबमधील राजकारण गेल्या काही दिवसांपासून दररोज वेगवेगळी वळणे घेताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि पंजाब प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वादाने राजकीय घडामोडींना सुरूवात झाली. या दोघांमध्ये काही दिवसांनी सामंजस्य झाल्याचे देखील दिसून आले होते. पण, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अखेर तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे पंजाबमधील राजकीय समीकरणंच बदलली.

पण आता ही समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता आहे. कारण कॅप्टन अमरिंदर सिंग हे आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले असून तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसवर टीका करण्याचे धोरण अवलंबले आहे. विशेषत: त्यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर निशाणा साधला आहे. देशासाठी नवज्योतसिंग हा एक आपत्ती ठरणार आहे. त्यामुळे २०२२मध्ये मी त्यांच्याविरोधात सक्षम उमेदवार उभा करीन. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला माझा कायम विरोध असेल, असे देखील कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले होते.