विकी कौशलच्या बहुचर्चित ‘सरदार उधम’चा टीझर रिलीज!


बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलच्या आगामी ‘सरदार उधम’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सरदार उधम सिंग हे एक महान स्वातंत्र्य सैनिक होते. हा चित्रपट त्यांच्या आयुष्यावर आधारित आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर विकी कौशलने सोशल मीडियावरून शेअर केला आहे.

हा टीझर विकी कौशलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ‘सरदार उधम’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये रोमांचक कथा असल्याचे दिसत आहे. टीझरच्या सुरुवातीला कागदपत्र दाखवण्यात आली आहेत. त्यात अनेक पासपोर्ट दिसत आहेत. प्रत्येक पासपोर्टवर नावे ही वेगवेगळी आहेत. उदे सिंग, फ्रैंक ब्राजील, शेर सिंग आणि शेवटी उधम सिंग यांचे नाव दिसते. सगळ्यात शेवटी उधम सिंग यांच्या पासपोर्टवर विकीचा चेहरा दिसतो. ही रोमांचक आणि मनोरंजक कथा आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे.


हा टीझर शेअर करताना शहीद भगत सिंग यांच्या जयंतीनिमित्ताने, मला त्यांचा मित्र सरदार उधम सिंग- एक माणून, वेगवेगळी नावे, एक मिशनची कथा तुमच्यासमोर आणण्यात अभिमान वाटत आहे. सादर करत आहे सरदार उधम, अशा आशयाचे कॅप्शन हा टीझर शेअर करत विकीने दिले आहे.

सरदार उधम सिंग यांच्या कथेवर आधारीत असलेल्या, या चित्रपटात ब्रिटिश साम्राज्याला हादरवून टाकणाऱ्या आणि १९१९ मध्ये झालेला जालियनवाला बाग हत्याकांडात आपल्या देशवासियांच्या झालेल्या मृत्युचा बदला घेण्याच्या त्यांच्या धैर्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळणार आहे.

अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १६ ऑक्टोबर रोजी ‘सरदार उधम’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सिरकार यांनी केले आहे. तर राइजिंग सन फिल्म्सने किनो वर्क्सच्या सहकार्याने या अमेझॉन ओरिजिनल मूव्हीची निर्मिती केली आहे.