उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी वेगवेगळ्या पद्धतीने घोटाळे करण्याची कला विकसित केली आहे – किरीट सोमय्या


कोल्हापुर – शिवसेना आणि सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारवर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टीका आणि गैरव्यवहाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी या दौऱ्यात कोल्हापूरच्या मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. त्यांनी त्यानंतर पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. तसेच किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांनी तिसरा १५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.

१५०० कोटींचा घोटाळा हसन मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने केला आहे. ही कला पण वेगळीच कला आहे. स्वतःच्या ग्रामविकास खात्याच्या कामाचे टेंडर मुश्रीफांनी स्वतःच्या जावयाच्या कंपनीलाच दिले. ज्या कंपन्या अस्तित्वात नाहीत त्या कंपन्यांमधून पैसे आले. ग्रामविकास खात्याने सगळ्या ग्रामपंचायतींसाठी निविदा काढल्या, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राज्यात घोटाळा करण्याची एक कला विकसित केली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने घोटाळे करायचे. मी हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात तक्रार दिली आहे. त्याची दखल त्यांना घ्यावी लागणार. कारण ती कंपनी अस्तित्वात नाही. अज्ञात कंपनीच्या नावाने बॅंक अकाऊंटद्वारे पैसे आपल्या कुटुंबाच्या खात्यामध्ये घेतला आहे. म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात कायदा समजवला. त्यांच्याकडे पुरावे दिल्याचे असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.