ईडीच्या चौकशीला हजर राहणार अनिल परब


मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अनिल परब अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या दुसऱ्या समन्सनंतर आता चौकशीसाठी हजर राहणार आहेत. अनिल परब यांनी स्वतः ही माहिती माध्यमांशी बोलताना दिली. आपण कोणताही गैरव्यवहार केला नसल्यामुळे आज ईडीच्या चौकशीला सामोरे जात असल्याचे अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.

अनिल परब म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या मुलींची शपथ घेऊन सांगत आहे की कोणत्याही गैरव्यवहारात आपला हात नाही. ईडीने आपल्याला का बोलावले आहे याची माहिती नाही. जे प्रश्न या चौकशीदरम्यान विचारले जातील, त्याला आपण उत्तर देणार आहोत.

अनिल परब यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. हे समन्स नेमक्या कोणत्या कारणासाठी बजावले आहे आणि आपल्याला चौकशीला का बोलावले आहे याची आपल्याला माहिती नसून ईडीला या प्रकरणी आपण संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

अनिल परब मुंबई आणि ठाण्यातील पोलीस दलातील बदल्या करत होते, असे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात सांगितल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून 50 कोटी रुपये वसूल करण्यासाठी सांगितल्याचा दावाही सचिन वाझे यांनी पत्र लिहून केला होता.