ठाणे : तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना करणारे वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी गीतकार जावेद अख्तर यांच्या विरोधात एकापाठोपाठ एक अब्रुनुकसानीचे दावे दाखल होत आहेत. अशाच एका प्रकरणात जावेद अख्तर यांना ठाणे न्यायालयाने 12 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. हा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यकर्ता विवेक चंपानेरकर यांनी दाखल करत अख्तर यांच्याकडून एक रूपया मानहानी वसूल करण्याची मागणी केली आहे. तसेच अख्तर यांच्याविरोधात मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयातही एका वकिलाने मानहानीचा दावा दाखल केल्यामुळे अख्तर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संघाची तुलना तालिबानशी केल्या प्रकरणी जावेद अख्तर यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा
जगभरात अफगाणिस्तानात झालेल्या सत्तांतरानंतर त्याचे पडसाद उमटत आहेत. अशातच अख्तर यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात मत व्यक्त करताना आरएसएसचा उल्लेख केला होता. ज्यात त्यांनी तालिबानी आणि आरएसएस एकसमान असल्याच्या आशयाची कथित तुलना केली होती. यामुळे अॅड. ध्रुतीमन जोशी यांनी त्यांच्या विरोधात मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. त्याच धर्तीवर आता ठाणे मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयातही दावा दाखल करण्यात आला आहे.
तालिबानची तुलना आरएसएसबरोबर जावेद अख्तर यांनी केली आहे. संघाची विचारसरणी तालिबानी सारखी आहे, आरएसएस लोकांची दिशाभूल करते, त्यांचे मानसिक खच्चीकरण करते, असेही अख्तर यांनी म्हटल्याचा दावा करण्यात आहे. यामुळे जनमानसात संघाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप या याचिकांतून करण्यात आला आहे. दरम्यान, जावेद अख्तर यांना या वक्तव्यावरुन अन्य एक वकील संतोष दुबे यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. ज्यात हे वक्तव्य मागे घेण्याची मागणी केलेली आहे. यामुळे जावेद अख्तर यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.