आम्ही आमची कॅबिनेट बैठक डेक्कन ओडिसीच्या रेल्वेमध्ये घेणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई – महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाने आज (27 सप्टेंबर) जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. डेक्कन ओडीसीप्रमाणे सुविधा आगामी काळात पर्यटन विभागाने सुरू करावी. आम्ही आमची कॅबिनेट बैठक रेल्वे किंवा त्या विमानातून करु, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. यावेळी राज्याच्या पर्यटन विभागाला काहीही कमी पडू देणार नाही. राज्य सरकार आणि राज्याचे अर्थखाते त्यांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, डेक्कन ओडीसीप्रमाणे सुविधा पर्यटन विभागाने लवकर सुरू करावी. आम्ही आमची कॅबिनेट बैठक त्या रेल्वे किंवा विमानात घेऊ. पण थोरात साहेब आपल्यावर जबाबदारी असेल की या प्रवासाच्या काळात आपल्याला बैठक संपवावी लागेल. कारण आता जग वेगवान आहे. आपण तिथे पोहचून परती प्रवास सुरू झाला, तरी आपली कॅबिनेट संपली नाही तर पंचायत होईल. आपण हे आव्हान घेतले पाहिजे. डेक्कन ओडीसीमध्ये कॅबिनेट नक्की करणार आहोत.

पर्यटनाला लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला. या काळात निर्बंध असतानाही नवी धोरणे आणली, नव्या सुविधा निर्माण केल्या, नवे रोजगार तयार केले त्यासाठी मी पर्यटन विभागाचे मंत्री, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. आजचे फोटो प्रदर्शन महाराष्ट्राच्या वैभवाचे ऐश्वर्याचे प्रदर्शन आहे. दुर्दैवाने या खात्याकडे लक्ष दिले गेले नाही. आता त्याला चांगल महत्त्व दिले जात असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

यावेळी महाराष्ट्रातील लेण्यांवर उद्धव ठाकरे यांनी अधिक भर दिला. ते म्हणाले, देशभरात जेवढ्या लेण्या आहेत त्यातील सर्वाधिक म्हणजे 1200 पैकी 800 लेणी महाराष्ट्रात आहेत. यातील 90 टक्के लेण्या अजूनही आपल्याला माहिती नाही. हजारो वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने लेणी कोरल्या तशा आज निर्माण करता येतील का? आपणही एक आजच्या युगातील लेणी तयार केली पाहिजे. केवळ जुने जतन करणे नाही तर नवेही तयार केले पाहिजे. बार्सिलोनामध्ये पुरातन काळापासून निर्माण केले जाणारे चर्च आहे. त्यात सुरुवातीपासून आजपर्यंतच्या शैलीचे काम पाहायला मिळते.

उत्तम सुविधा महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येक पर्यटकाला मिळाल्या पाहिजेत. पर्यटन विभागाने यासाठी प्रयत्न करावेत. पर्यटकच आपले ब्रँड अम्बॅसिडर झाले पाहिजेत, दुसऱ्याची गरज पडायला नको, अशी सूचना त्यांनी पर्यटन विभागाला केली.