अशा गोष्टीची सक्ती तालिबानने केली की पुरुषांचेही झाले वांदे


काबूल – तालिबान्यांनी अफगाणिस्तानमधील हेल्मांड प्रांतामधील केशकर्तनालयांसाठी एक आदेश जारी केला आहे. यापुढे कोणाचीही दाढी करु नये तसेच दाढी ट्रीम देखील करु नये, असे तालिबानने या आदेशामध्ये म्हटले आहे. याचे नाभिक म्हणून काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने उल्लंघन केल्यास त्याला कठोर शिक्षा करण्यात येणार असल्याचा इशारा या आदेशात देण्यात आल्याचे वृत्त बीसीसीने दिले आहे.

आम्हालाही अशाप्रकारच्या धमक्या मिळाल्याचे राजधानी काबूलमधील अनेक नाभिकांनी म्हटले आहे. या धमक्या तालिबान्यांकडून दिल्या जात असल्याचे नाभिकांचे म्हणणे आहे. मागील कार्यकाळामध्ये लागू केलेले कठोर नियम लागू करणार नाही आणि पूर्वीपेक्षा जास्त चांगल्यापद्धतीने आम्ही कारभार करु, असा शब्द देशातील नागरिकांना दिल्यानंतर आता दाढी करण्यासारख्या अत्यंत खासगी गोष्टीमध्येही तालिबानकडून बंधने घातली जात असल्याचे चित्र दिसत आहे. या दाढी ट्रीम न करण्याच्या सक्तीमुळे आता अनेक पुरुषांसमोर दाढीची देखभाल कशी करावी, यासंदर्भातील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाभिकांसाठी हेल्मांडमध्ये तालिबान्यांनी जागोजागी पत्रके लावली आहेत. कोणालाही तक्रार करण्याचा हक्क नसल्याचे यावर लिहिले आहे. या नाभिकांना आधीच दाढी करण्याची सेवा थांबवण्याचा इशारा तालिबान्यांनी दिला आहे. तसेच आम्ही गुप्तपणे तुमच्या पाळत ठेऊन तुम्हाला रंगेहाथ पकडू आणि कठोर शिक्षा करु. असे झाल्यास त्याला तुम्हीच सर्वस्वी जबाबदार असाल, असे तालिबानने या नाभिकांना सांगितले आहे.

काबूलमधील एका लोकप्रिय केशकर्तनालयाच्या मालकाने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, तालिबान सरकारमधील एका व्यक्तीने फोन करुन अमेरिकन पद्धतीचे अनुकरण करणे थांबवा, अशी धमकी दिली आहे. १५ ऑगस्ट रोजी तालिबानने काबूलमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आणि १६ ऑगस्टला राजधानीवर ताबा मिळवत सत्ता ताब्यात घेतली. त्यानंतर महिन्याभराने येथील व्यवहार हळूहळू सुरळीत होऊन पुरुष केस कापण्यासाठी, दाढी करण्यासाठी केशकर्तनालयांमध्ये येत आहेत. वेगवेगळ्या फॅशनच्या हेअरस्टाइल आणि दाढी ट्रीमींगला तरुणांचे प्राधान्य असतानाच आता तालिबान्यांकडून याला विरोध केला जात आहे.