या दिवशी रिलीज होणार रणवीरचा ’83’


कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक चित्रपटांच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्या होत्या. पण आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्यामुळे महाराष्ट्रात २२ ऑक्टोबर पासून चित्रपटगृह आणि मल्टीप्लेक्स पुन्हा एकदा सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर ’83’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे. अभिनेता रणवीर सिंहने स्वत: पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रणवीरने ’83’ चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने चित्रपट ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. ‘ती वेळ आली आहे… 83 हा चित्रपट ख्रिसमसमध्ये चित्रपटगृहामंध्ये रिलीज होणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे’ या आशयाचे कॅप्शन रणवीरने फोटो शेअर करत दिले आहे.


यापूर्वी ४ जून २०२१ रोजी ’83’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार होता. रणवीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली होती. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळली आहे. तर चित्रपटामध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.