न्यायालयाच्या अवमानप्रकरणी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचे वादग्रस्त वक्तव्य


नवी दिल्ली – सरकारी अधिकाऱ्यांना न्यायालयाच्या अवमानाची भीती बाळगू नये, असे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी म्हटले आहे. तुम्ही तुमचे काम करताना कंटेम्प्ट ऑफ कोर्टची भीती बाळगू नका, मी अशा प्रकरणांना सामोरा जाईन. न्यायालय आदेश देऊ शकते पण आदेशाचे पालन कोण करणार? कारण माझ्या नियंत्रणाखाली पोलीस असल्याचेही बिप्लब देव म्हणाले.

मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव शनिवारी रवींद्र भवनात टीसीएस अधिकाऱ्यांच्या २६ व्या द्विवार्षिक परिषदेला संबोधित करताना म्हणाले, अनेक अधिकारी मला सांगतात की न्यायालयाचा अवमान होईल, या भीतीमुळे ते एखादे काम करू शकत नाहीत. अशी भीती कशाला? न्यायालय निर्णय देण्याचे काम करते पण त्याची अंमलबजावणी पोलीस करतात आणि माझ्या नियंत्रणात पोलीस आहेत. त्यासाठी पोलिसांकडे अनेक पद्धती आहेत आणि मी त्याचा साक्षीदार असल्याचेही ते म्हणाले.

तसेच न्यायालयाचा अवमान केल्यामुळे आतापर्यंत किती लोकांना तुरुंगात टाकण्यात आले, मी येथे आहे, न्यायालयाच्या अवमान प्रकरणात तुम्ही तुरुंगात जाण्यापूर्वी मी जाईन, असंे देब म्हणाले. तसेच कोणालाही तुरुंगात टाकणे सोप्पे काम नसते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांचे काम लक्षात ठेवले जाते. जर न्यायालय पोलिसांना एखाद्या व्यक्तीला तुरुंगात टाकण्यास सांगत असेल, तर आरोपी सापडलाच नाही, असे पोलिसांनी सांगावे. शेवटी ताकद तर बापाच्या हातात असते ना, असेही देब यांनी म्हटले आहे.

दरम्यान, देब यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत आहे. मुख्यमंत्री स्वतः न्यायपालिकेचा अपमान कसे करू शकतात, असा सवालही करण्यात येत आहे. तृणमुल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी देब यांचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. निर्लज्जपणे देब यांनी लोकशाहीची थट्टा केली आहे, सन्माननीय न्यायव्यवस्थेची जाहीरपणे चेष्टा केली आहे. न्यायालयाप्रती आणि न्यायव्यवस्थेप्रती गंभीर अनादर दाखवणाऱ्या देब यांच्या वक्तव्यांची सर्वोच्च न्यायालय दखल घेईल का? असा सवाल अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे.