२२ ऑक्टोबरपासून सुरू होणार राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे


मुंबई – आणखी एक मोठा निर्णय राज्यातील महाविकासआघाडी सरकारने घेतला आहे. शाळा, धार्मिकस्थळांपाठोपाठ आता, राज्यभरातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्यास देखील परवानगी दिली गेली आहे. त्यानुसार राज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे २२ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान ‘वर्षा’ येथे आज झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. कोरोना नियमांचे पालन करून चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्यास राज्य सरकारकडून परवानगी दिली गेली आहे.

२२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून, ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

आज(शनिवार) टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली.

दरम्यान कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना बरेच निर्बंध राज्य सरकारने शिथिल केलेले आहेत. पण असे असले तरी सरकारने नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्याची परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या कलाकारांचे हाल होत होते. सरकारचे लक्ष याकडे वेधण्यासाठी राज्यातील कलाकार व या क्षेत्राशी निगडीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी मागील महिन्यात ठिकठिकाणी आंदोलनं केले होते.

१ सप्टेंबरपासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्याचे आश्वासन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले होते. पण या आंदोलक व कलाकारांमध्ये ही घोषणा हवेत विरल्याची भावना होती. याच पार्श्वभूमीवर पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात नटराजाची महाआरती देखील करण्यात आली होती. सरकारला जागे करण्यासाठी जागर आणि गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री प्रिया बेर्डे, अभिनेते गिरीश ओक, अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते.