अनिल परब यांना ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स


मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) परिवहनमंत्री अनिल परब यांना दुसरे समन्स बजावले आहे. परब यांना हे समन्स २८ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याबद्दल बजावण्यात आले आहे. आशा आहे की अनिल परब आता तरी चौकशीला हजर राहतील, असे खोचक ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.

हे समन्स मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये बजावल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भातील वृत्त एबीपी माझाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ईडीने काही दिवसांपूर्वी सचिन वाझे याचा जबाब नोंदवला होता, ज्यामध्ये त्याने सांगितले होते की पोलीस दल आणि परिवहन विभागाच्या बदल्यांमध्ये २० कोटी रुपये अनिल परब यांनी घेतले होते. तसेच काही दिवसांपूर्वी परिवहन विभागाचे अधिकारी आणि परब यांच्या जवळचे मानले जाणारे बजरंग खरमाटे यांचीही चौकशी ईडीकडून करण्यात आली होती. त्यानंतर परब यांना आता दुसरे समन्स बजावण्यात आले आहे.

परब यांना पहिले समन्स ३१ ऑगस्ट रोजी बजावण्यात आले होते. पण त्यावेळी त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे त्यांनी ईडीकडे १४ दिवसांची मुदत मागितली होती. तेव्हा ती ईडीने मान्यही केली होती. तर गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख, अनिल परब यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी ट्विट करत परबांवर खोचक टिप्पणी केली आहे. आशा आहे आता तरी अनिल परब २८ सप्टेंबरला ईडीसमोर उपस्थित होतील, असे ट्विट त्यांनी केले आहे.