डोंबिवलीत 15 वर्षीय मुलीवर 29 जणांचा सामूहिक बलात्कार


डोंबिवली: गणेशोत्सवादरम्यान अंधेरीतील साकीनाका परिसरात घडलेल्या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाल्यानंतर आता उपनगर असलेल्या डोंबिवलीतही एक खळबळजनक घटना समोर आली आहे. 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर डोंबिवलीमध्ये सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 आरोपींना ताब्यात घेतले आहे.

राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या मुलांचा या आरोपींमध्ये समावेश असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे. जानेवारी महिन्यात पीडित मुलीवर प्रियकराने बलात्कार करत व्हिडीओ काढला. पीडित अल्पवयीन मुलीला या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करत तिच्यावर 29 जणांनी बलात्कार केल्याची माहिती सध्या समोर आली आहे. पोलिसांचा सध्या या प्रकरणी तपास सुरू असून आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

मानपाडा पोलीस ठाण्यात डोंबिवलीत राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीने तिच्यावर 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरू असल्याबाबत तक्रार नोंदवली आहे. पीडित तरुणीला पोलिसांनी विश्वासात घेत चौकशी सुरू केली. या चौकशीमध्ये जे काही समोर आले ते ऐकूण पोलीस हैराण झाले. पीडित तरुणीवर जानेवारी महिन्यात तिच्या प्रियकराने बलात्कार करत तिचा व्हिडीओ काढला. या तरुणाने हा व्हिडीओ आपल्या मित्रांना दाखवला.

पीडितेला या व्हिडीओच्या आधारे धमकी देत 29 जणांनी या पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. बदलापूर, रबाळे, मुरबाड आणि डोंबिवलीत वेगवेगळ्या ठिकाणी तिला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामधील दोन अल्पवयीन असल्याची देखील माहिती आहे. 21 आरोपींच्या अटकेनंतर पोलीस सहा आरोपींच्या शोधात आहेत. दरम्यान पीडितेला उपचारासाठी ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची तब्येत स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.