करुणा शर्मा यांना अखेर २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर


बीड – जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा न्यायालयीन कोठडीत होत्या. पण आता त्यांना अखेर बीडमधील अंबाजोगाई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. त्यांची न्यायालयाकडून २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे.

करूणा शर्मा काही दिवसांपूर्वी परळीत दाखल झाल्यानंतर त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना अंबाजोगाई न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चलबिचल पाहायला मिळाली.

सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करणाऱ्या करुणा शर्मा रविवारी परळीत दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी यावेळी केलेल्या तपासणीत त्यांच्या वाहनामध्ये पिस्तूल आढळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तर, सोशल मीडियातून धनंजय मुंडेंच्या विरोधातील सर्व पुरावे जाहीर करण्याचा इशारा देऊन करुणा या परळीत दाखल झाल्या होत्या.