अनंत गीतेंच्या शरद पवारांवरील वक्तव्यावर संजय राऊत म्हणतात…


नवी दिल्ली – महाविकास आघाडीत शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांच्या वक्तव्यामुळे सध्या वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म झाला असून शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच असल्याचे सांगत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनंत गीतेंच्या या वक्तव्यावरुन नाराजी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील दिल्लीत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली असून शरद पवार देशाचे नेते असल्याचे म्हटले आहे.

यावेळी अनंत गीते यांच्या वक्तव्यासंबंधी संजय राऊत यांना विचारण्यात आले असता त्यांनी आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगत बोलण्यास नकार दिला. पण नंतर पत्रकारांनी पुन्हा विचारले असता ते म्हणाले की, शरद पवार देशाचे नेते आहेत. महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र असून शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार बनवले आहे. महाराष्ट्रातील सरकार पाच वर्ष टिकेल. कारण या सरकारला संपूर्ण महाराष्ट्राची मान्यता आहे.

दरम्यान संजय राऊत काँग्रेस आणि शिवसेना कधीच एकत्र होऊ शकत नाही यासंबंधी बोलताना म्हणाले की, त्यासंबंधी उद्धव ठाकरे निर्णय घेतील. पक्षाचे प्रमुख यांसंबंधी निर्णय घेत असतात. या क्षणी आम्ही सरकारमध्ये एकत्र असून सरकार चांगले चालले आहे.