अटकेच्या भीतीने अखेर न्यायालयात हजर झाली कंगना राणावत


अंधेरी न्यायालयाने मानहानी प्रकरणी पुढील सुनावणीस गैरहजर राहिल्यास बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला अटक वॉरंट बजावण्यात येईल, असा इशारा दिला होता. यानंतर अखेर कंगना सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाली आहे. कंगनाला कोरोनाची चाचणी करता यावी यासाठी १४ सप्टेंबरला पार पडलेल्या सुनावणीत तिला मंगळवारच्या सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा देण्याची विनंती कंगनाच्या वतीने न्यायालयाला करण्यात आली होती.

गेल्या काही आठवड्यांपासून कंगना चित्रीकरणात व्यस्त होती. शिवाय तिला कोरोनाची लक्षणे आहेत. कंगनाचा चाचणी अहवाल सकारात्मक आल्यास सुनावणीसाठी गैरहजर राहण्याची मुभा पुन्हा एकदा मागितली जाईल. त्यावेळी तिचा वैद्यकीय अहवालही सादर केला जाईल, असा दावाही कंगनाच्या वतीने करण्यात आला.

परंतु अख्तर यांच्यातर्फे कंगनाच्या मागणीला विरोध करण्यात आला. तसेच आतापर्यंत कंगना एकाही सुनावणीला हजर झालेली नाही. या उलट आपण प्रत्येक सुनावणीला हजर राहात असल्यामुळे सतत गैरहजर राहणाऱ्या कंगनाविरोधात अटक वॉरंट बजावण्याची मागणी अख्तर यांच्या वतीने करण्यात आली होती. या प्रकरणी सुरू केलेल्या कारवाईला आव्हान देणारी कंगनाची याचिका उच्च न्यायालयानेही रद्द केल्याकडे अख्तर यांच्या वकिलाने न्यायालयाचे लक्ष वेधले.

कंगनाची मंगळवारच्या सुनावणीला गैरहजर राहण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली. त्याच वेळी कंगना पुढील सुनावणीच्या वेळी गैरहजर राहिली, तर तिच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात येईल, असा इशाराही न्यायालयाने दिला होता. न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर अखेर कंगनाने २० सप्टेंबरच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजेरी लावली. या प्रकरणी पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला होणार आहे.