राज्यातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात आरोग्यमंत्र्यांची महत्वपूर्ण माहिती


जालना : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत सध्यातरी नसल्याची माहिती जालन्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे. पण सणासुदीच्या काळात राज्यात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ शकते, पण लसीकरणाची गती वाढवली, तर संक्रमण जास्त होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्याच्या घडीला राज्यात दररोज 13 ते 14 लाखांच्या दरम्यान लसीकरण करण्यात येत असून डेल्टाची रुग्णसंख्या सध्या राज्यात स्थिर असल्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, असेही टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात दररोज 15 ते 20 लाख लसीकरण करण्याचा आरोग्य विभागाचा मानस असून आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करून घेण्यासाठी फिरत असल्याचे देखील टोपे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. राज्यात रविवारी 3 हजार 413 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 8 हजार 326 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. राज्याचा रिकव्हरी रेट 97.16 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्ण आहेत. पुण्यात सध्या 11 हजार 720 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, राज्यात सध्या 42 हजार 955 सक्रिय रुग्णसंख्या आहे. राज्यात 2,81,561 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत, तर 1,752 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.