गुजरातमध्ये 9 हजार कोटी किंमतीचे 3 हजार किलोचे हेरॉईन जप्त


अहमदाबाद : ड्रग्ज तस्करी प्रकरणी गुजरातमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. 3 हजार किलो हेरॉईन गुजरातमधील कच्छ येथील मुंद्रा पोर्टवर दोन कंटेनरमधून जप्त करण्यात आले आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत तब्बल 8 कोटी ते 9 हजार कोटी रुपये असल्याची माहितीही समोर आली आहे. ही छापेमारी डीआरआयच्या माध्यमातून गांधीधाम, मांडवी, अहमदाबाद, चेन्नई आणि दिल्लीपर्यंत करण्यात आली.

आतापर्यंत या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. या ड्रग्ज तस्करीत मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अफगानिस्तानातून हे हेरॉईन आणल्याची माहिती मिळत आहे. डीआरआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज घेऊन जाणारे कंटेनर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एका फर्मने आयात केले होते आणि फर्मने हा माल टॅल्कम पावडर असल्याचे सांगितले होते. तर अफगाणिस्तानमधील कंधार येथे असलेल्या हसन हुसेन लिमिटेड या फर्मने हा सर्व माल निर्यात केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गेल्या पाच दिवसांपासून डीआरआय आणि कस्टमने सर्च ऑपरेशन सुरु केले होते. या कारवाईदरम्यान, मुंद्रा पोर्टवरील दोन कंटेनरच्या तपासात 9 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्यानंतर देशातील पाच शहरांमध्ये तपास सुरु करण्यात आला.