चरणजीत सिंह चन्नी यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ


पंजाब : कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. चरणजीत सिंह चन्नी यांना जबाबदारी सोपवण्याचा निर्णय काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. पंजाबमध्ये पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दलित शीख चेहऱ्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही चन्नी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर चंदिगढमधील राजभवनात जाऊन त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. चन्नी यांच्यासोबत पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवजोत सिंह सिद्धू आणि पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावतही उपस्थित होते. राज्यपालांशी जवळपास अर्धा तासाच्या भेटीनंतर चरणजीत सिंह चन्नी यांनी राजभवना बाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आज होणाऱ्या शपथविधीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आज सकाळी 11 वाजता ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

अमरिंदर सिंग सरकारमध्ये चरणजीत सिंह चन्नी तंत्रशिक्षण आणि पर्यटन मंत्री होते. चमकौर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. पंजाब विधानसभेत ते विरोधी पक्षनेते राहिले आहेत. चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर काँग्रेस नेते सुखजिंदर सिंह रंधावा म्हणाले की, हा हायकमांडचा निर्णय आहे. मी त्याचे स्वागत करतो. चन्नी माझ्या लहान भावासारखे आहेत.