आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात मुश्रीफांचा 100 कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्या


कराड : हसन मुश्रीफ यांचा गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी संबंध काय ? असा सवाल करत या कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. माझ्यावर कारवाई मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील ईडी कारवाईच्या भीतीने करण्यात आली. ईडीला मुश्रीफ यांच्या विरोधातील सर्व पुरावे देणार असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे. उद्या यासंबंधीचे पुरावे ईडी आणि इनकम टॅक्स विभागाकडे देणार आहे. या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही मी लवकरच उघडकीस आणणार असल्याचेही सोमय्या म्हणाले.

सोमय्या म्हणाले की, कोणत्याही प्रकारे ट्रान्सपरंट बिलिंग न होता, हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रा लि या कंपनीला 2020 साली दिला. साखर कारखाना चालवायाचा या कंपनीला अनुभव नाही. पण या कंपनीला हा कारखाना का दिला, हे शरद पवारांना माहिती आहे. कारण मतीन हसीन मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई असून या ब्रिक इंडियाचे ते बेनामी मालक आहेत. या कंपनीत 7185 एस यू कॉर्पोरेशन प्रायव्हेट, 998 मतीन हसीनचे, तर 998 गुलाम हुसेनचे शेअर आहेत. म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखे 98 टक्के शेअर एस यू कार्पोरेशन या बेनामी कंपनीकडे आहेत. म्हणजे 2019-20 मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी, जो भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला, तो येथे पास केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कारखान्यातील घोटाळ्याबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सकडे उद्या तक्रार करणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.