या देशांत सुद्धा पाळले जातात पितृपक्ष

अनंतचतुर्दशीनंतर होणाऱ्या पौर्णिमेनंतरचा पंधरा दिवसांचा काळ भारतात पितृपक्ष म्हणून पाळला जातो. या काळात पितरांची आठवण ठेऊन त्यांची श्राद्ध पक्ष केली जातात. त्यासाठी काही पूजा केल्या जातात. पण ही प्रथा फक्त भारतापुरती मर्यादित नाही. जगात अनेक देशात असे पितृपक्ष साजरे होतात फक्त त्याची वेळ आणि पद्धत वेगळी असते. चीन, जर्मनी, सिंगापूर, थायलंड, जपान सारख्या अनेक देशात मृतासाठी शांती भोजन देण्याची प्रथा पाळली जाते.

शेजारी नेपाळ देशात ऑगस्ट सप्टेंबर याकाळात गायींची मिरवणूक काढली जाते. ज्या घरात त्या वर्षात मृत्यू झाला आहे असे लोक अश्या मिरवणुका काढतात. गाय पवित्र आहे आणि त्यामुळे मृतांना शांती मिळते असे मानले जाते. फ्रांस मध्ये ‘ला टेसेंट’ नावाने हा उत्सव १ नोव्हेंबरला पाळला जातो. या दिवशी कुटुंबातील लोक एकत्र जमून पूर्वजाच्या कबरीची साफसफाई करतात, ताजी फुले वाहतात,मेणबत्या लावतात. नंतर चर्च मध्ये प्रार्थना करून एकत्र जेवण केले जाते. या दिवशी सरकारी सुट्टी असतेच पण शाळा दोन आठवडे बंद असतात.

चीन मध्ये छिंग मिंग नावाने हा कार्यक्रम होतो. यात पूर्वजांचे स्मरण करून त्यांना थंड जेवणाचा नैवेद्य दाखवून थंड जेवणाचा प्रसाद घेतला जातो. कबर साफ करून पूजा केली जाते आणि प्रार्थना होते. २ हजार वर्षापासून ही प्रथा पाळली जात आहे. जपान मध्ये अबोन फेस्टिव्हल याच कारणाने ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात होतो. पितरांच्या कबरीवर श्रद्धांजली दिली जाते, घरे सजविली जातात. पितर घरी येतात, त्यांना मार्ग दिसावा म्हणून घराबाहेर कंदील लावले जातात. अनके पक्वान्ने केली जातात, नृत्यगाणी म्हटली जातात आणि पितरांना परतीचा मार्ग दिसावा म्हणून नदीत दिवे सोडले जातात.

सिंगापूर, मलेशिया,थायलंड, श्रीलंका अश्या देशात ‘हंग्री घोस्ट फेस्टिव्हल’ साजरा होतो. अनेक आशियाई देशात बौद्ध आणि टोईस्टी धर्मात ही प्रथा आहे. चीनच्या कॅलेंडर मधील सातवा महिन्याची पंधरावी रात्र हा तो दिवस असतो. या दिवशी नरकाचे दरवाजे उघडतात आणि पृथ्वीवर पूर्वजांचे आत्मे भोजनासाठी येतात. ज्यांना स्वर्गात प्रवेश मिळालेला नाही असे हे आत्मे भुकेले असतात असे मानले जाते.

द. कोरिया मध्ये चुसेओक नावाचा हा उत्सव सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये साजरा होतो. घरातील मृत व्यक्तींना धन्यवाद दिले जातात. तीन दिवस हा उत्सव होतो. त्यात तांदुळाच्या कण्यापासून बनविलेला पदार्थ कबरीवर ठेवला जातो आणि घरातही तांदळाचे पदार्थ भोजनासाठी बनविले जातात. जर्मनी मध्ये ‘ऑल सेंट्स डे’ १ नोव्हेंबर रोजी साजरा होतो. हा दिवस शोकदिन असतो. या काळात थंडी खूप असते त्यामुळे पितरांच्या आठवणीसाठी मेणबत्त्या लावल्या जातात आणि मृताच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली जाते.