पोळी किंवा भात, वजन घटविण्यासाठी कोणता पर्याय उत्तम ?


वजन घटवायचे झाल्यास नियमित व्यायामासोबत संतुलित आणि प्रमाणबद्ध आहाराचीही जोड द्यावी लागत असते. आहाराची आखणी करताना कोणते पदार्थ आहारामध्ये समाविष्ट असावेत आणि कोणते पदार्थ समाविष्ट असू नयेत याचा विचार करणे महत्वाचे ठरत असते. तसेच हा आहार केवळ वजन घटविण्यासाठीच नसून, घटलेले वजन पुन्हा वाढू नये या म्हणूनही आखणे महत्वाचे असते. त्यामुळे आपल्या दैनंदिन आहारामध्ये भाज्या, फळे, इतर पौष्टिक पदार्थ समाविष्ट करीत असतानाच पोळी किंवा भात, यांपैकी वजन घटविण्याच्या दृष्टीने कोणत्या पदार्थाची निवड करणे योग्य आहे हा प्रश्नही कायम पडत असतो. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये पोळी आणि भात हे दोन्ही पदार्थ महत्वाचे असून, दररोजच्या भोजनामध्ये या पदार्थांचा समावेश असतो. मात्र हे दोन्ही पदार्थ कर्बोदाकांनी युक्त असतात. अतिप्रमाणात कर्बोदके खाल्ली गेल्याने त्यापासून शरीरात कॅलरीजच्या रूपात अतिरिक्त उर्जाही निर्माण होत असते. ही उर्जा खर्च न झाल्यास तिचे रूपांतर चरबीत होऊन वजन वाढत असते. त्यामुळे भात आणि पोळी हे दोन्ही पदार्थ आहारामध्ये असणे आवश्यक असले, तरी त्यांचे प्रमाण मर्यादित असणे आवश्यक असते.

मात्र वजन घटविण्याच्या दृष्टीने भात किंवा पोळी या पदार्थांचा विचार केला, तर आहारतज्ञ पोळी अधिक योग्य असल्याचे म्हणतात. भात किंवा पोळी यांमधील पोषणमूल्ये लक्षात घेता या दोन्हीमध्ये फारसा फरक नसला, तरी पोळीमध्ये डायटरी फायबर अधिक असल्याने पोळी खाल्ल्याने भूक लवकर शमते. त्या उलट भातामध्ये कॅलरीज अधिक असून, त्यामध्ये फायबर नगण्य प्रमाणात असते. भाताच्या मानाने पोळीचा पर्याय अधिक चांगला असला, तरी दिवसभराच्या आहारामध्ये पोळीचे प्रमाणही नियंत्रित ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे दोन्ही वेळच्या जेवणांमध्ये मिळून मध्यम आकाराच्या चार पोळ्यांपेक्षा अधिक पोळ्या दैनंदिन आहारात असू नयेत.

रात्रीच्या भोजनामध्ये देखील पोळी समाविष्ट करायची असेल, तर रात्रीचे भोजन सायंकाळी सात वाजता करण्याचा सल्ला आहारतज्ञ देतात. पोळीमध्ये फायबर अधिक असल्याने ती पचण्यास अधिक अवधी लागतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणात पोळी समाविष्ट असल्यास जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळेमध्ये किमान तीन तासांचे अंतर असणे आवश्यक असल्याचे म्हटले जाते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment