फ्लॅवनॉईड्सने परिपूर्ण आहार अनेक गंभीर रोगांपासून बचाव करण्यास उपयुक्त.


आपल्या आहारामध्ये असलेल्या सर्व भाज्या आणि फळांमध्ये असलेल्या फायटोकेमिकल्सना ‘फ्लॅवनॉईड्स’ म्हणण्यात येते. शरीरातील इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी फ्लॅवनॉईड्स अतिशय उपयुक्त असतात. म्हणूनच आपल्या दैनंदिन आहारामध्ये फ्लॅवनॉईड्सने परिपूर्ण ताज्या भाज्या आणि फळे नियमित असण्याबद्दल आहारतज्ञ आग्रही असतात. याबद्दल संशोधन केले असता, फ्लॅवनॉईड्सने परिपूर्ण असलेला आहार अनेक गंभीर रोगांपासून बचाव करणारा ठरत असल्याचे निदान वैज्ञानिकांनी केले आहे. यामध्ये कर्करोगापासून हृद्यरोगापर्यंत अनेक रोगांचा समावेश आहे. याचा विशेष फायदा धूम्रपान आणि मद्यपानाचे व्यसन असणाऱ्यांसाठी आहे.

डेन्मार्कमध्ये एडिथ कोवान विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी स्थानिक नागरिकांच्या खानपानाच्या सवयींबाबत सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचा कालावधी तब्बल तेवीस वर्षांचा असून, यामध्ये ५३ हजारांहून अधिक नागरिकांच्या आहाराचे अवलोकन केले गेले. या सर्वेक्षणामध्ये केल्या गेलेल्या निरीक्षणाच्या आधारे, ज्या व्यक्तीच्या आहारामध्ये फ्लॅवनॉईड्स युक्त पदार्थ अधिक प्रमाणांत होते, त्यांच्या बाबतीत कर्करोग किंवा हृदयाशी निगडीत रोग उद्भवण्याचा धोका पुष्कळ अंशी कमी असल्याचे म्हटले गेले आहे. तसेच या व्यक्तींच्या आहारामध्ये शाकाहारी पदार्थ अधिक असल्याचेही म्हटले गेले आहे.

वैज्ञानिकांच्या अनुसार ज्यांच्या आहारामध्ये दररोज ५०० मिलीग्राम पेक्षा अधिक फ्लॅवनॉईड्स आहेत, त्यांच्या बाबतीत कर्करोग आणि इतर गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता कमी असते. धूम्रपान आणि मद्यपानाचे व्यसन असणाऱ्यांच्या बाबतीत कर्करोग, हृदयरोग उद्भवण्याची शक्यता अधिक असते. अश्या व्यक्तींनी धूम्रपान किंवा मद्यपान करणे कमी करून आहारामध्ये फ्लॅवनॉईड्सने परिपूर्ण पदार्थ खाण्यास सुरुवात केल्यास त्यांचाही गंभीर रोगांपासून बचाव होऊ शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment