हे खाद्यपदार्थ दिवसभरात कोणत्या वेळी खाणे योग्य?


आजच्या काळातील आपली खाद्यपरंपरा पाहिली, तर आपल्या पूर्वजांच्या आहारामध्ये जितकी उर्जा, म्हणजे कॅलरीज असत, त्यापेक्षा किमान वीस टक्के अधिक कॅलरीज आपल्या आजकालच्या आहारामध्ये असल्याचे निदा एका सर्वेक्षणाद्वारे करण्यात आले आहे. तसेच पूर्वीच्या काळी होते त्या पेक्षा आताच्या काळामध्ये शारीरिक श्रम कमी झाल्याने शरीरातील कॅलरीज खर्च करण्यासाठी अतिरिक्त व्यायामाची व आहारनियमनाची आवश्यकता आता भासू लागली आहे. त्यातून आजकाल आपल्या दैनंदिन आहारामध्ये अनेक पर्याय उपलब्ध झाले असले, तरी आपल्या आरोग्यासाठी योग्य असेच पर्याय निवडण्याकडे आपला कल वाढला आहे. पण केवळ आरोग्यासाठी हितकारी पदार्थ निवडणे महत्वाचे नसून हे पदार्थ दिवसभरात कधी खाल्ले जावेत त्याचा ही विचार करणे महत्वाचे आहे. अन्यथा पदार्थ कितीही पौष्टिक असले, तरी ते केवळ चुकीच्या वेळी खाल्ले गेल्याने त्यापासून फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यताच अधिक असते.

केळे सकाळी उठल्याबरोबर खाल्ले जाण्याचा सल्ला अनेकदा दिला जात असतो. मात्र सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी केळे खाल्ल्याने शरीरातील एनर्जी लेव्हल्स कमी होण्याची शक्यता अधिक आहे. केळे खाल्ल्यानंतर त्यातील साखरेमुळे सुरुवातीला शरीरातील एनर्जी लेव्हल्स तत्काळ वाढत असल्या तरी दोन तासांनी या लेव्हल्स कमी होण्यास सुरुवात होते. क्वचित काहींना यामुळे पचनाशी निगडित समस्या उद्भवून पोट बिघडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर केळे न खाता, सकाळी केल्या जाणाऱ्या नाश्त्यामध्ये केळे समाविष्ट करावे. केळ्याचे सेवन स्निग्ध पदार्थांची मात्रा अधिक असलेल्या पदार्थासोबत करावा. म्हणूनच सकाळच्या नाश्त्यामध्ये केळे खायचे झाल्यास त्यासोबत गरम दूध, त्यामध्ये थोडे तूप घालून घ्यावे. सकाळी उठल्याबरोबर अनेकांच्या दिवसाची सुरुवात कॉफीने होत असते. पण एका रिसर्चच्या अनुसार दिवसाची सुरुवात सकाळी उठताबरोबर रिकाम्या पोटी कॉफीने न केली जाता, सकाळच्या नाश्त्याच्या, किंवा भोजनाच्या काही वेळ आधी कॉफीचे सेवन सर्वोत्तम मानले गेले आहे. भोजनाच्या काही वेळी आधी कॉफीचे सेवन केल्याने त्यातील कॅफीन पचविण्याची शरीराची क्षमता अधिक असते. तसेच संध्याकाळनंतर कॉफी सेवन करणे टाळावे.

आपल्या दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट असलेला मुख्य पदार्थ म्हणजे भात. आहारतज्ञांच्या मते भात दुपारच्या भोजनामध्ये अधिक, तर रात्रीच्या भोजनामध्ये अगदी कमी प्रमाणात खाल्ला जावा. भातामध्ये असलेली कॉम्प्लेक्स कर्बोदके पचण्यास कठीण असतात. दुपारच्या भोजनामध्ये भात खाल्ला गेल्याने दिवसभराच्या कामात असताना शरीर सक्रीय असल्याने भाताचे पचन सहज होते. मात्र रात्री झोपल्यानंतर पचनक्रिया शिथिल झाल्याने कर्बोदकांचे पचन होण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे भात दुपारच्या भोजनामध्ये समाविष्ट असावा. साखर किंवा साखरयुक्त प्रोसेस्ड पदार्थ टाळण्याचा सल्ला आरोग्यपूर्ण शरीरासाठी महत्वपूर्ण असला, तरी काही वेळा खाद्यपदार्थांमधील साखर टाळता येत नाही. त्यामुळे असे पदार्थ भोजनानंतर, मर्यादित प्रमाणात खाणे योग्य मानले गेले आहे. मधल्या वेळेच्या भुकेसाठी प्रोसेस्ड पदार्थ टाळणेच चांगले.

लहान मुलांच्या दिवसाची सुरुवात एक ग्लास गरम दुधाने होत असली, तरी मोठ्यांच्या बाबतीत मात्र सकाळी दुधाचे सेवन इतर पदार्थांच्या जोडीने केले गेले, तर त्यामुळे पोटात दुखणे, किंवा छातीत जळजळ होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मोठ्या मंडळींनी दुध संध्याकाळी सेवन करणे उत्तम मानले गेले आहे. यामुळे रात्री शांत झोपही लागते. शरीराला आवश्यक प्रथिने मांसाहारतून मुबलक प्रमाणात मिळत असली, तरी मांसाहारी पदार्थ रात्रीच्या भोजनामध्ये सेवन ने केले जाणे चांगले. जर रात्रीच्या भोजनामध्ये मांसाहारी पदार्थांचे सेवन करायचेच असेल, तर भोजन आणि त्यानंतरची झोप यामध्ये किमान तीन तासांचे अंतर असेल असे पहावे. अनेकांना दिवसभरामध्ये ‘हेल्दी स्नॅक’ म्हणून मधल्या वेळेच्या भुकेसाठी सुका मेवा खाण्याची सवय असते. सुका मेवा हा सकाळच्या नाश्त्यासोब्त किंवा मधल्या वेळेच्या भुकेसाठी खाणे योग्य असून, सुका मेवा पचण्यास जड असून, रात्रीच्या भोजनाआधी मात्र हा खाणे टाळावे. सुक्यामेव्या प्रमाणेच स्निग्ध पदार्थांची मात्रा अधिक असलेले चीझ, बटर सारखे पदार्थही पचण्यास जड असल्याने रात्री झोपण्याआधी खाल्ले जाणे टाळावे. शेंगभाज्या, किंवा उसळी खायच्या झाल्यास दुपारच्या भोजनामध्ये किंवा सायंकाळी भोजन लवकर करायचे झाल्यास भोजनात समाविष्ट असाव्यात. मात्र रात्री झोपण्याच्या काही काळ आधी शेंगभाज्या किंवा कडधान्यांच्या उसळी खाल्ल्या तर त्यामुळे गॅसेस होऊन पोटफुगीची समस्या उद्भवू शकते.

फळांच्या बाबतीत बोलायचे झाले, तर संत्रे, मोसंबी सारखी आंबट रसाची फळे आम्लयुक्त असल्याने यांचा रस सकाळी उठल्याबरोबर सेवन करणे किंवा नाश्त्यासोबत अथवा भोजनासोबत करणे टाळावे. यातील आम्लांमुळे छातीत जळजळ होणे, पोट जड होणे, अश्या समस्या उद्भवू शकतात, तसेच आपण खाल्लेल्या भोजनातील पौष्टिक तत्वेही शरीरात योग्य रीतीने अवशोषित होऊ शकत नाहीत. त्यामुळे ही फळे खायची झाल्यास भोजन झाल्यानंतर काही वेळाने, किंवा दोन भोजनातील मधल्या वेळेला खाणे उत्तम. सफरचंद खायचे झाल्यास ते संध्याकाळच्या भोजनानंतर खाणे टाळावे. रात्री सफरचंद सेवन केल्याने पोटामध्ये गॅसेस होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे हे फळ सकाळच्या वेळामध्ये खाल्ले जाणे उत्तम.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment