मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन


मुंबई :- प्रबोधनकार स्व. केशव सीताराम ठाकरे यांना १३६ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे अभिवादन केले.

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, प्रबोधनकार ठाकरे यांनी पुरोगामित्वाचा जागर केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे ते अग्रणी होते. सामाजिक चळवळींनाही त्यांनी बळ दिले. अनिष्ट प्रथा, चालीरीतींना कडाडून विरोध केला. सुधारणांचा आग्रह धरताना लेखणी,वाणी आणि कृतीशील संदेश देणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
महाराष्ट्राच्या भूमीत विज्ञानवादी, सुधारणावादी विचार रुजवणारे क्रांतिकारी नेते, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील आघाडीचे नेतृत्व स्वर्गीय केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन त्यांना भावपूर्ण अभिवादन केले आहे.

प्रबोधनकार ठाकरे यांना आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रबोधनकार ठाकरे हे सुधारणावादी विचारांचे कृतीशील नेते होते. समाजातील वाईट रुढी, परंपरा, जातीव्यवस्था, अस्पृश्यतेवर त्यांनी प्रहार केला. बालविवाह, केशवपन, हुंडाप्रथेसारख्या रुढींविरुद्ध प्रखर लढा दिला. ते खऱ्या अर्थानं ‘प्रबोधन’कार होते. लेखक, पत्रकार, इतिहास संशोधक म्हणूनही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील आघाडीचे नेतृत्व म्हणून त्यांचे योगदान खुप मोठं आहे. त्यासाठी ते महाराष्ट्राला नेहमीच आदरणीय राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी प्रबोधनकारांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली.