राज कुंद्रा प्रकरणी पोलिसांकडे शिल्पाने नोंदवला जबाब


मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती व उद्योगपती राज कुंद्रा याच्यासह चौघा जणांविरोधात १४६७ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. दरम्यान शिल्पाने नोंदवलेल्या जबाबानुसार २०१५ मध्ये राज कुंद्रा याने ‘विआन इंडस्ट्रीज ली.’ नावाची कंपनी सुरू केली होती.

शिल्पा शेट्टीचे त्या कंपनीमध्ये २४.५० टक्के समभाग होते. शिल्पा या कंपनीत एप्रिल २०१५ ते जुलै २०२० या कालावधीत संचालक पदावर होती. शिल्पाने त्यानंतर वैयक्तिक कारणास्तव संचालकपदाचा राजीनामा दिल्याचे जबाबात सांगितले.

आपल्याला हॉटशॉट अ‍ॅप व बॉली फेम या संदर्भात काही माहिती नसल्याचे शिल्पाने सांगितले. पॉर्न फिल्मची निर्मिती करून त्याच्या प्रसारणासाठी कुंद्राने २०१९ मध्ये आर्म्स प्राईम मीडिया नावाने कंपनी स्थापन केली.

या कंपनीच्या माध्यमातून पॉर्न फिल्म प्रसारणासाठी तयार करण्यात आलेले हॉटशॉट्स नावाचे अ‍ॅप्लिकेशन लंडनस्थित केनरीन कंपनीला विकले. पण या अ‍ॅप्लिकेशनबाबतची बरीच कामे कुंद्रामार्फतच चालू होती. राज कुंद्राने या अ‍ॅप्लिकेशन निर्मितीसाठी पैशांची गुंतवणूक केली होती. दरम्यान पॉर्नोग्राफी प्रकरणात कुंद्रा हा मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले आहेत.

कुंद्रासह मालमत्ता कक्षाने कारवाई करून या अश्लील अ‍ॅप्लिकेशनच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख रायन जॉन मायकल थॉर्प यालाही अटक केली होती. त्याचाविरोधातही गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी ३७ वे न्यायालय यांच्याकडे हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

राज काय करतो हे कामात व्यस्त असल्यामुळे मला माहित नसल्याचा जबाब अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पोलिसांना दिला आहे. याप्रकरणाचा बहुतांश तपास पूर्ण झाला असून उर्वरित परदेशातील बँकांकडून पैशांच्या देवाण-घेवाणीबाबतची माहिती गुन्हे शाखेने मागितली आहे. ती अद्याप प्रलंबित आहे.