पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा


मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून पंतप्रधानांना निरोगी, दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वसमावेशक विकास घडो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, भारतासारख्या महान लोकसत्ताक देशाचे पंतप्रधान होण्याचे भाग्य आपल्याला दोनदा लाभले आहे. स्वतंत्र भारतात जन्म झालेले आपण देशाचे पहिले पंतप्रधान आहात. पंतप्रधानपदी झालेली फेरनिवड ही देशवासियांच्या विश्वासाचे, अपेक्षांचे प्रतिक आहे. देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण करुन त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याचे बळ आपणास मिळो. पंतप्रधान म्हणून आपल्या नेतृत्वाखाली देशाची एकता, अखंडता, सार्वभौमत्व, संविधान, लोकशाही व्यवस्था अबाधित राहो.

देशातील महागाई, बेरोजगारी, कोरोनासह आर्थिक, सामाजिक संकटांवर यशस्वीपणे मात करुन देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यात आपणास यश मिळो, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांना दिल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्याही पंतप्रधान म्हणून आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांची पूर्तता होईल. महाराष्ट्राला तसेच समस्त देशवासियांना समान न्याय, विकासाची समान संधी उपलब्ध करुन देण्याचं काम आपल्याकडून होईल, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केली आहे.