शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांची तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती


मुंबई : शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची देशातील प्रतिष्ठीत आणि श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. मिलिंद नार्वेकरांची ट्रस्टचे सदस्य म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारसीनंतर नियुक्ती करण्यात आली आहे. देशभरातून 24 व्यक्तींची नियुक्ती या यादीत करण्यात आली आहे.

देशभरातून मोठी चढाओढ तिरुपती ट्रस्टच्या सदस्यपदी वर्णी लागावी म्हणून असते. पण, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री संवाद साधून ही नियुक्ती सुचवतात. याचप्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केल्यानंतर मिलिंद नार्वेकरांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली. या नियुक्तीमुळे नार्वेकरांच्या खांद्यावरील जबाबदारी वाढली असून त्यांचे वलय देशपातळीवर विस्तारल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काल (बुधवारी) आंध्र प्रदेश सरकारने देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत देशभरातून 24 व्यक्तींची नियुक्ती केली जाते. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची महाराष्ट्रातून या यादीत वर्णी लागली आहे. देशातील सर्वाधिक प्रतिष्ठित अशा आंध्र प्रदेशातील तिरूमला येथील तिरुपती देवस्थानाची ख्याती आहे. आंध्र प्रदेश सरकारने काल अधिकृत अधिसूचना काढत, नवी तिरूमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांच्या नावांची यादी जाहीर केली आहे.

दरम्यान, याआधीच मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमिअर लीग (MPL) आणि गवर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची धुरा शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या खांद्यावर आहेच. त्यानंतर आता देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानाच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. शिवसेना आणि मिलिंद नार्वेकर हे समीकरण राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत असते. अशातच आता मिलिंद नार्वेकरांवर सोपवलेल्या या नव्या जबाबदारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.