ईडीने पुन्हा एकदा जॅकलिन फर्नांडिसला बजावले समन्स


बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जॅकलीन फर्नांडिस मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर सापडल्यामुळे या चर्चा सुरु झाल्या होत्या. जॅकलीनची काही दिवसांपूर्वी ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. जॅकलीनची दिल्लीत तिहार कारागृहातून २०० कोटी रुपये वसूल करणारा सुकेश चंद्रशेखर प्रकरणी ६ तास चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, पुन्हा एकदा ईडीने जॅकलिनला समन्स बजावले आहे.

जॅकलीनची चौकशी ३० ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीने पुन्हा एकदा जॅकलीनला समन्स बजावले आहे. यासंदर्भात ‘न्युज १८’ने दिलेल्या वृत्तानुसार, २५ सप्टेंबर रोजी जॅकलीनला ईडीसमोर चौकशीसाठी हजर रहावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०० कोटी रुपये तिहार कारागृहातून वसूल करणारा सुकेश चंद्रशेखर स्वत:ची खरी ओळख न सांगता जॅकलिनला फोन करत असे. तो स्पूफिंगद्वारे तिहार जेलमधून जॅकलिनला फोन करत असल्याचे म्हटले जात आहे. जॅकलिनला त्याने काही महागाड्या भेटवस्तू देखील गिफ्ट म्हणून पाठवल्या होत्या. पण चौकशीदरम्यान जॅकलिनने तिला भेटवस्तू पाठवणारी आणि फोन करणारी व्यक्ती जेलमध्ये असल्याची कल्पना देखील नसल्याचे जॅकलीन म्हणाली होती.