मनोज पाटील प्रकरणात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उडी


मुंबई – आत्महत्येचा मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटील याने प्रयत्न केला आहे. मनोज पाटील याने यावेळी आपल्या सुसाईड नोटमध्ये, अभिनेता साहिल खान याच्यावर आपल्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. मला अभिनेता साहिल खान मानसिक त्रास देत असल्याचा आरोप देखील मनोज याने यात केला आहे. याच पार्श्वभूमीवर, या प्रकरणात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. जर २० सप्टेंबरला साहिल खान मनसे कार्यालयात आला नाही, तर त्याला त्या पद्धतीचा दणका देण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे. दरम्यान, सध्या कूपर रुग्णालयात मनोज पाटील दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

मनसे मनोज पाटील आणि साहिल खान यांच्यात मध्यस्थी करेल, असं देखील मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे. साहिल खानला आम्ही बोलावून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू. मनोज पाटील यांच्या कुटुंबियांशी बोलून आम्ही विषय समजून घेतलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी साहिल खानला बोलावलेले आहे. यावेळी, मनोज पाटील आणि साहिल खान यांच्यातील समज-गैरसमज दूर करू, असं संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

बुधवारी (१५ सप्टेंबर) रात्री मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न केला. आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता साहिल खान त्रास देत असल्याचा आरोप देखील मनोज पाटीलने केला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावरही व्हिडीओ शेअर करत हे आरोप केले होते. त्रास आणि बदनामीमुळेच आपण आत्महत्येचे पाऊल उचलत असल्याचे मनोज पाटीलने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.