उत्तर कोरियाने केली रेल्वेतून ८०० किलोमीटर पेक्षा जास्त पल्ला गाठणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी


प्योंगप्यांग – आता रेल्वेमधून क्षेपणास्त्र चाचणी करत नेहमी सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या उत्तर कोरियाने जगाला धक्का दिला आहे. ८०० किलोमीटर पेक्षा जास्त पल्ला असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. क्षेपणास्त्र रेल्वेतून वाहून नेत आणि ते यशस्वीपणे डागत उत्तर कोरियाने जगाला आपली क्षमता दाखवून दिली आहे. उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणीचे एक छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. डागलेले क्षेपणास्त्र हे ८०० किलोमीटर अंतर पार करत जपान जवळच्या समुद्रात कोसळले.

क्षेपणास्त्र रेल्वेतून वाहून नेण्यामुळे क्षेपणास्त्राचा ठाव ठिकाण समजणे अवघड जाते, विशेषतः उपग्रहापासून – ड्रोनपासूनही ते लपवता येते. रेल्वेमुळे क्षेपणास्त्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जलद आणि सुरक्षित नेता येते. रेल्वेतून क्षेपणास्त्र डागण्याची यशस्वी चाचणी घेतल्यामुळे उत्तर कोरियाच्या मारक क्षमतेत एक महत्त्वाची भर पडली आहे.

याआधीच उत्तर कोरिया गेले अनेक महिने विविध पल्ल्यांची मारक क्षमता असलेल्या विविध क्षेपणास्त्रांची चाचणी करत आला आहे. नुकतेच क्रुझ क्षेपणास्त्राची चाचणी करत स्वतःची मारक क्षमता जगाला दाखवून दिली आहे. पण अशा चाचण्यांमुळे त्या भागातील शांततेचा भंग होत असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. रेल्वेतून केलेल्या ताज्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे दक्षिण कोरिया आणि जपानच्या चिंतेत भर पडली आहे.