आयकर विभागाकडून सोनू सूदशी संबंधित सहा ठिकाणांची पाहणी


आयकर विभागाचे अधिकारी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतील कार्यालयात पोहोचले असून सोनू सूदच्या कार्यालयाची अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जात आहे. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. नुकतीच दिल्ली सरकारच्या शाळकरी विद्यार्थीसाठीच्या अभियानासाठी सोनू सूदची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली असून त्यानंतर काही दिवसांतच आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

यावेळी राजकारणात प्रवेश करण्याच्या दृष्टीने भेट झाल्यासंबंधी सोनू सूदला विचारण्यात आले होते. त्याने आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे सांगितले होते. आम आदमी पक्षातील नेत्यांच्या भेटीनंतर सोनू सूद राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.

खऱ्या अर्थाने लॉकडाउनमुळे ४८ वर्षीय सोनू सूद जास्त चर्चेत आला. सोनू सूदने लॉकडाउनमध्ये अडकलेल्या अनेक परप्रांतीयांना त्यांच्या घऱी पोहोचवण्याचे काम केले. त्याचबरोबर अनेकांच्या जेवणासोबत राहण्याची, रोजगाराचीही त्याने व्यवस्था केली. लॉकडाउन काळात केलेल्या समाजकार्यामुळे सोनू सूदवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे त्याला राजकीय रंगही दिला जात होता. यामुळे त्याच्या राजकारणातील चर्चाही रंगल्या होत्या. पण नेहमीच या चर्चा अफवा असल्याचे सोनू सूदने सांगितले आहे.