रविवारपासून सुरु होणाऱ्या आयपीएलआधीच बीसीसीआयची क्रिकेट रसिकांसाठी मोठी घोषणा


नवी दिल्ली – रविवारपासून इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) उर्वरित पर्व सुरु होत असून त्याआधी क्रिकेट रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयपीएल आयोजन समितीने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार प्रेक्षकांना या आयपीएलसाठी मैदानामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. १९ सप्टेंबर म्हणजेच रविवारी पाचवेळा ही स्पर्धा जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील तर तीनदा आयपीएल विजेता राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघाशी सामना खेळणार आहे. सीएसकेचा संघ धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार असून हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

आमच्यासाठी हा सामना खास असणार आहे कारण आयपीएल आता त्यांच्या चाहत्यांचे स्टेडियममध्ये स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे. कोरोना परिस्थितीमुळे असणाऱ्या निर्बंधांमुळे असणारी चाहत्यांच्या उपस्थितीवरील बंदी उठवण्यात आल्याचे आयपीएलने म्हटले आहे. १६ सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून या सामन्यांची तिकीट चाहत्यांना विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच iplt20.com वर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच latinumList.net या वेबसाईटवरुनही तिकीटे विकत घेता येतील.

आयपीएलचे उर्वरित सामने दुबई, शारजा आणि आबु धाबीमधील मैदानांवर खेळवले जाणार आहे. कोरोना नियमांचे पालन करुन आणि युएई सरकारने आखून दिलेल्या नियमांनुसार या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या सत्रामध्ये आयपीएल २०२१ मध्ये २९ सामने खेळवण्यात आले. पण काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे अनिश्चित काळासाठी आयपीएल स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर आयपीएल युएईमध्ये घेण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतला. याच ठिकाणी खेळवली टी २० विश्वचषक स्पर्धा १९ ऑक्टोबरपासून जाणार असल्यामुळे बीसीसीआयने येथेच सामने खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.