चीनच्या दक्षिणपूर्व फुजियान भागात कोरोनाचे थैमान


फुजियान – चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर या व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले. असे असताना चीनमध्ये गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली होती. पण आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाबाधितांची संख्या चीनच्या दक्षिणपूर्व फुजियान भागात झपाट्याने वाढत असल्याचे चित्र दिसत असल्यामुळे पुतियान शहरातील चित्रपटगृह, जीम, महामार्ग बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर रहिवाशांना शहर न सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरकारने हा निर्णय कोरोनाचा उद्रेक पाहता घेतला आहे.

कोरोनाबाधितांची संख्या फुजियानमधील पुतियान शहरात वाढत आहे. यासाठी चीन आरोग्य विभागाने या ठिकाणी तपासणीसाठी एक तज्ज्ञांची टीम पाठवली आहे. कोरोनाचे संकट पाहता तेथील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. १३ सप्टेंबरला ५९ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर प्रशासन ख़डबडून जागे झाले आहे. १२ सप्टेंबरला ही संख्या २२ होती. रुग्णसंख्या दुप्पटीने वाढल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे योग्य वेळी पावले उचलली नाहीत, तर कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

५ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या फुजियान भागात अवघ्या चार दिवसात १०२ रुग्ण आढळले आहेत. राष्ट्रीय सुट्ट्या १ ऑक्टोबरपासून सुरु होत आहेत. पर्यटक फुजियानला पर्यटनासाठी मोठ्या संख्येने येतात. पण कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता यावर प्रशासनाने निर्बंध आणले आहेत. त्याचा पर्यटन आणि वाहतूक क्षेत्राला फटका बसला आहे.

चीनमध्ये १२ सप्टेंबरपर्यंत एकूण ९५ हजार २४८ कोरोना रुग्ण आढळले. तर ४ हजार ६३६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा उद्रेक शेवटचा चीनच्या जियांगसू भागात झाला होता. दोन आठवड्यापूर्वी तेथील स्थिती नियंत्रणात आली आहे. पण आता पुतियानमध्ये आढळून आलेल्या रुग्णांमध्ये डेल्टा रुग्ण अधिक असल्याचे समोर आल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.