साकीनाका बलात्कार प्रकरणी हेमांगी कवीची पोस्ट; व्यक्त केला संताप


राज्यात एकीकडे उत्साहात गणपतीचे आगमन होत असतांना, आर्थिक राजधानी मुंबईत दुसरीकडे मन सुन्न करणारी घटना घडली. मुंबईतील साकीनाका येथे महिलेवर बलात्कार करण्यात आला आणि यावेळी आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तिचा २ दिवसापूर्वी उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

प्रत्येक स्तरातून या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात आली. अगदी राजकारणी ते सेलिब्रिटी आणि सामान्य माणसांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान नेहमीच आपले मत अभिनेत्री हेमांगी कवी स्पष्टपणे सर्वांसमोर मांडत असते. यावेळी देखील तिने या प्रकरणात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. फेसबूकवर ही पोस्ट हेमांगीने शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हेमांगीने आपला संताप व्यक्त केला आहे.

हेमांगीने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणते, आणखी एक! तिचीच चूक असणार! तिचे कपडे चुकले असतील! एवढ्या रात्री ती काय करत होती? एकटी होती की कुणासोबत होती? तिची जात काय, धर्म काय, कुठे काम करत होती? किती कमवत होती? लग्न झालेली होती, अविवाहित होती, घटस्फोटीत होती, मुलं बाळं किती? ती मुंबईची की आणखी कुठली! सगळं सगळं तीचंच चुकलं असणार!चला आता आपण तिलाच आणखीन घाबरऊन ठेऊया! बाकी त्याला कसलंच बंधन नको, सगळी सूट देऊया! काय?”

दरम्यान शुक्रवारी साकीनाक्यामध्ये झालेल्या या बलात्कार प्रकरणात मोहन चौहान नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या नराधमाने बलात्कार केल्यानंतर पीडितेवर चाकूने वार देखील केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.