किरीट सोमय्यांचा हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप


मुंबई – ठरल्याप्रमाणे आज पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अजून एका मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आणि शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी अनिल परब, अनिल देशमुख अशा सत्ताधारी मंत्र्यांनंतर आता आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वळवला आहे.

किरीट सोमय्या यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावेच आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचे जाहीर केले. तसेच, फक्त हसन मुश्रीफच नाही, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबियांच्या नावे हे पुरावे असल्याचे ते म्हणाले. त्याशिवाय, यासंदर्भात मंगळवारी ईडीकडे अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचे ते म्हणाले.

राज्य सरकारमधील ११ भ्रष्टाचारी मंत्र्यांची यादी मी जाहीर केली होती. पण दुर्दैवाने ११ जणांच्या टीममध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढायला लागली आहे. राखीव खेळाडूंमध्ये हसन मुश्रीफ यांचे नाव आम्ही वाढवत आहोत. शेकडो कोटींचे घोटाळे हसन मुश्रीफ परिवाराने केले आहेत. बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे माझ्याकडे २७०० पानांचे पुरावे आहेत. मी आयकर विभागाला ते सोपवले असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत.

CRM Systems PVT LTD प्रविण अगरवाल ऑपरेट करतात. हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी या कंपनीतून दोन कोटींचे लोन घेतल्याचे दाखवले आहे. २०१७-१८मध्ये या कंपनीवर प्रतिबंध आला होता. ज्यांनी त्या कंपनीतून एंट्री घेतली, त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. त्याच कंपनीतून नाविद मुश्रीफ यांनीही निवडणुकीसाठी फॉर्म भरला होता. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवले आहे की सीआरएम कंपनीत २ कोटी ४५ लाख ३५४ एवढी रक्कम दाखवली आहे. सीआरएम ही शेल कंपनी असल्याचे सिद्ध झाल्याचा दावा सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.

३ कोटी ५ लाख रक्कम मरू भूमी कंपनीत दाखवली आहे. बाप-बेटे दोघांविरोधात १२७ कोटींचे पुरावे आमच्याकडे आहेत. हसन मुश्रीफ यांच्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात पत्नी शाएदा हसन मुश्रीफ यांच्या अकाऊंटमध्ये सर संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ३ लाख ७८ हजार ३४० रुपयांचे शेअर्स दाखवले आहेत. २०१८-१९ मध्ये मुश्रीफ परिवारावर आयकर विभागाचे छापे झाले. त्यातून आलेली माहिती दडपण्याचा प्रयत्न झाला. त्यात १४७ कोटी रुपयांचे पुराव्यानिशी बेनामी व्यवहार सिद्ध झाले आहेत. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाने सर सेनापती संताजी-धनाजी साखर कारखान्यात १०० कोटींहून अधिक भ्रष्टाचाराचा पैसा पार्क केल्याचे गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत.

मुंबई ईडीकडे उद्या अधिकृत तक्रार दाखल करणार आहे. २७०० पानांचे पुरावे त्यांना देणार आहे. परवा दिल्लीला अर्थविभाग, ईडी, कंपनी मंत्रालय येथे देखील हे पुरावे मी सादर करणार आहे. ठाकरे सरकारच्या डर्टी घोटाळा ११ मध्ये राखीव खेळाडूंची भरती चालूच राहणार आहे. माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या २ मंत्र्यांच्या फाईल तयार होत्या. आज राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याचा घोटाळा उघड केला आहे. काही दिवसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांचा देखील घोटाळा उघड करू, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणांमध्ये नेमका घोटाळा कसा होतो, हे देखील किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. समजा, एखाद्याकडे जर भ्रष्टाचाराचे पैसे आले, तर तो रोख पैसे ऑपरेटरला देतो. शेल कंपन्यांचे ऑपरेटर असतात. प्रवीण अगरवाल या प्रकरणात आहेत, भुजबळांच्या केसमध्ये जैन म्हणून होता. त्यांना आपण कॅश देतो. ही कॅश घेतल्यानंतर शेल कंपनी ऑपरेटर त्यांची लेअर बनवतात. एका कंपनीत आधी टाकतात. मग त्या कंपनीतून चेक घेऊन दुसऱ्या कंपनीत करतात. मुश्रीफांच्या प्रकरणात नाविदच्या खात्यात सीआरएम कंपनीने २ कोटींचा चेक दिला. सीआरएमच्या खात्यात तो चेक अजून एका लेअरवाल्या कंपनीतून आला. त्या कंपनीमध्ये कॅश भरली गेली. सगळ्यात शेवटी ती कॅश कुणाला मिळाली, ते पाहायचे असते, असे सोमय्या म्हणाले.