मार्च 2022 पर्यंत पुन्हा प्रवाशाच्या सेवेत रूजू होण्यास जेट एअरवेज सज्ज


मुंबई – आता 2022 पासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेमध्ये रूजू होण्यास जेट एअरवेज सज्ज झाली आहे. नव्या वर्षात पहिल्या टप्प्यामध्ये डोमॅस्टिक आणि नंतर मर्यादित स्वरूपात आंतरराष्ट्रीय स्तरावर विमानसेवा सुरू होणार आहे. दिल्ली -मुंबई मार्गावर यापैकी पहिले उड्डाण होणार आहे. जेट एअरवेज एप्रिल 2019 मध्ये डबघाईला आल्याने बंद पडली होती. bankruptcy laws मुळे अडचणीत आलेली जेट एअरवेज ही पहिली भारतीय कॅरिअर आहे, जी पुन्हा सुरू होत आहे. नव्या रूपात जेट एअरवेज त्याचा बेस मुंबई ऐवजी दिल्ली एनसीआरमध्ये हलवणार आहे. दरम्यान 2022 च्या पहिल्या तिमाही देशांतर्गत सेवा सुरू केल्यानंतर तिसऱ्या, चौथ्या तिमाहीमध्ये काही आंतरराष्ट्रीय मार्गांवरही विमानसेवा सुरू करण्याचा जेट एअरवेजचा विचार आहे.

जेट एअरवेज 2.0 बद्दल Jalan Kalrock Consortium कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जेट एअवेजला जून 2021 मध्ये National Company Law Tribunal कडून परवानगी मिळालेली आहे. त्यानंतर इतर यंत्रणांकडूनही आवश्यक कागदपत्रांची, परवानग्यांची जुळवाजूळव सुरू झाली आहे.

जेट एअरवेजकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सेवेमध्ये 150 पेक्षा अधिक लोकांना घेतले आहे. त्यानंतर 1000 पेक्षा अधिक लोकांना घेण्याचा विचार आहे. एअरलाईनच्या ऑपरेशनल रिक्वायरमेंटसाठी मेरीटवरच उमेदवार निवडले जाणार आहेत. तसेच ही नोकरभरती देखील टप्प्या टप्प्याने केली जाईल.