10 हजारहून अधिक महिलांना रोजगार देणार ओला


नवी दिल्ली : देशातील ऑटो मार्केटमध्ये ओलाने ई-स्कूटर आणल्यानंतर आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. तामिळनाडूमध्ये फक्त महिला ओला इलेक्ट्रिक स्कूटर प्लांट चालवतील. यासाठी 10 हजारांहून अधिक महिलांना प्लांटमध्ये रोजगार मिळणार आहे. आत्मनिर्भर भारताला आत्मनिर्भर महिलांची गरज आहे. त्याचबरोबर हा जगातील एकमेव मोटार वाहन निर्मिती प्रकल्प असेल, जो केवळ महिलांद्वारे चालवला जाईल, असे कंपनीचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी सांगितले.


त्याचबरोबर, ओला ई-स्कूटर प्लांटमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या पहिल्या तुकडीचे सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून भाविश अग्रवाल यांनी स्वागत केले. ते म्हणाले की, केवळ 10,000 हून अधिक महिला कर्मचाऱ्यांसह महिलांनी चालवलेली जगातील ही ओला फ्यूचर फॅक्टरी सर्वात मोठी फॅक्टरी बनेल. ओलाचा हा महिलांना आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी अधिक समावेशक कार्यबल तयार करण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. या महिलांचे मुख्य उत्पादन कौशल्य सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ओला फ्यूचर फॅक्टरीमध्ये उत्पादित प्रत्येक वाहनासाठी त्यांच्यावर पूर्णपणे जबाबदारी असेल.

ओलाचे चेअरमन अग्रवाल एका रिपोर्टचा हवाला देत म्हणाले की, केवळ महिलांनाच श्रमशक्तीमध्ये समान संधी मिळाल्यामुळे देशाचे सकल घरेलू उत्पादन (जीडीपी) 27 टक्क्यांनी वाढू शकते. महिलांचा उत्पादन क्षेत्रात सहभाग सर्वात कमी 12 टक्के आहे. महिलांना आर्थिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना सक्षम करणे केवळ त्यांचे जीवनच नव्हे, तर त्यांचे कुटुंब आणि संपूर्ण समाज देखील सुधारते. भारताला जगातील उत्पादन केंद्र बनवण्यासाठी आपण महिलांना कार्यशक्तीमध्ये समाविष्ट करून त्यांचे कौशल्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे, असे अग्रवाल म्हणाले.