काही अन्नपदार्थांच्या विषयीची ही रोचक तथ्ये तुम्हाला माहिती आहेत का?


दररोजच्या आपल्या आहारामध्ये कितीतरी निरनिराळ्या अन्नपदार्थांचा समावेश असतो. ज्याप्रमाणे प्रांत वेगळे, संस्कृती वेगळी, लोकांची जीवनशैली निराळी, तशीच विविधता अन्न पदार्थांमध्येही आढळून येत असते. आपला आहार आणि त्यापासून आपल्या शरीराला मिळणारे पोषण हा महत्वाचा भाग असला, तरी आपण नेहमी खात असलेल्या किती तरी अन्नपदार्थांशी निगडीत तथ्ये आपल्याला माहिती नसतात. अन्नपदार्थांच्या विषयी काही रोचक तथ्ये जाणून घेऊ या. बटाटे हा जगभरातील सर्वच प्रकारच्या आहारांमध्ये हमखास आढळून येणारा पदार्थ आहे. मात्र वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार मानवी शरीरामध्ये आणि बटाट्यामध्ये असलेले पाण्याचे प्रमाण आणि रसायने यांमध्ये पुष्कळ साम्य आहे. बटाटे वायफाय सिग्नल्स शोषून घेऊन ते सिग्नल्स पुन्हा परावर्तित करु शकतात. किंबहुना बोईंग विमाने बनविणाऱ्या तंत्रज्ञांना जेव्हा विमानाच्या आतील वायफाय सिग्नल्सचे परीक्षण करायचे होते, तेव्हा त्यासाठी त्यांनी इतर कोणतीही यंत्रणा न वापरता अनेक पोती भरून आणलेल्या बटाट्यांचा वापर केला होता !

केळे हे फळ जगभरामध्ये उपलब्ध असणारे, सर्वसामान्यांना परवडणारे आणि बहुतेकांना आवडणारे फळ आहे. आपल्यापैकी अनेक जण सकाळच्या नाश्त्याला केळे खाणे पसंत करतात. दिवसभराच्या धावपळीला सुरुवात करताना शरीराला आवश्यक ती उर्जा उपलब्ध करून देणारी पोषक तत्वे या फळामध्ये आहेत. आजच्या काळामध्ये जगभरामध्ये दीडशे हून जास्त देशांमध्ये आणि एक हजाराहूनही अधिक प्रकारच्या प्रजातींमध्ये उपलब्ध असणारे हे फळ आहे. कॅव्हेंडीश नामक केळ्यांची प्रजाती पाश्चात्य देशांमध्ये खूप लोकप्रिय आणि सर्वात जास्त उपलब्ध असणारी आहे. मात्र या केळ्यांमध्ये बिया नसल्याने (seedless) या केळ्यांच्या झाडांचे क्लोनिंग करून ही झाडे लावली जात असतात ! मध हा पदार्थही आपल्या आहारामध्ये तसेच अनेक घरगुती उपायांमध्ये वापरला जात असतो. मात्र आजकाल मधातही अनेक प्रकारची भेसळ दिसून येऊ लागली आहे. नैसर्गिक आणि शुद्ध मध कधीही खराब होत नाही हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेले तथ्य आहे. २०१५ साली इजिप्तमध्ये काही पिरामिड्समध्ये शोध घेत असताना पिरामिड्समध्ये मधाने भरलेले अनेक हंडे सापडले होते. परीक्षण केले गेले असता हा मध सुमारे तीन हजार वर्षापूर्वीचा असल्याचे आढळून आले !

आपल्यापैकी प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये सहज सापडणारे काळे मिरे हा मसाल्याचा पदार्थ एके काळी सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नव्हता. किंबहुना एके काळी सोने किंवा चांदी इतकाच काळ्या मिऱ्यांचा भाव बाजारपेठेत असे. हा मसाल्याचा पदार्थ त्या काळी केवळ श्रीमंतांना परवडण्याजोगा असून, भारतामध्ये पिकविला जाणारा हा पदार्थ समुद्राच्या मार्गे अन्य देशांमध्ये पाठविला जात असे. या पदार्थाला त्या काळी इतका जास्त भाव होता, की कर आणि घरभाडे देखील रोख रक्कमेच्या रूपात दिले जाण्याऐवजी, तितक्याच किंमतीचे काळे मिरे दिले जात असत.

Leave a Comment