अमरावतीमध्ये गर्भवती बलात्कार पीडितेची गळफास घेऊन आत्महत्या


अमरावती – मुंबईतील साकीनाका परिसरात महिलेवर झालेल्या बलात्कारानंतर अमानुष अत्याचार केल्यानंतर झालेल्या मृत्यूमुळे संताप व्यक्त होत असतानाच राज्यात अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन गर्भवती बलात्कार पीडितेने अमरावतीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. ही घटना येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात घडली आहे. पीडिता बलात्कारानंतर सात महिन्यांची गर्भवती राहिली होती. पीडितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शवविच्छेदन झाल्यानंतर पीडिता सात महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. एका संशयिताला याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

शुक्रवारी येवदा पोलीस ठाण्यात पीडितेच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत. पीडितेवर गेल्या नऊ महिन्यांपासून अत्याचार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.

येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. सर्वसाधारण कुटुंबातील या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आले. १७ वर्षीय पीडित मुलीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यात आले. या प्रकारात सदर मुलगी सात महिन्यांची गरोदर राहिली. ही बाब तिच्या पालकांना समजली नव्हती, पण आत्महत्या झाल्यावर रुग्णालयात शवविच्छेदन अहवालात मृत युवती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्यामुळे प्रकरण गंभीर वळणावर आले.

यासंबंधात आई-वडिलांनी संशयित आरोपी असलेल्या मुलाकडे चौकशी केली, पण त्याने असे काहीही झाले नसल्याचे म्हणत हात वर केले. या प्रकाराने धक्का बसून पीडित मुलीने २९ ऑगस्टला रात्री गळफास लावून आत्महत्या केली. पण शुक्रवारी पोलिसात याबाबतची तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.