उत्तर प्रदेश सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; मथुरेत दारू, मांस विक्रीवर बंदी!


मथुरा – उत्तर प्रदेश सरकारने मथुरेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराजवळील १० चौरस किमी क्षेत्र तीर्थस्थळ म्हणून सरकारने घोषित केले आहे. तसेच या परिसरात दारू आणि मांस विक्री करण्यास मनाई असणार आहे. या परिसरात येणाऱ्या भाविकांची आस्थेचा विचार करता हा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ श्रीकृष्ण जन्माष्टमीला मथुरेला आले होते. श्रीकृष्णाचे त्यांनी यावेळी दर्शन घेतले. दरम्यान साधूसंतांनी केलेल्या मागणीनुसार मथुरेत मांस आणि दारू विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. या व्यवसायामुळे प्रभावित लोकांना त्यांनी दुग्धव्यवसाय करण्याचा सल्लाही दिला होता.

मथुरा जिल्हा प्रशासनाला योग्य आदित्यनाथ यांनी आदेश दिल्यानंतर १० दिवसांनी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. मथुरा वृंदावन क्षेत्रातील सुमारे १० चौरस किमी क्षेत्र तीर्थक्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या भागात उत्पादन शुल्क आणि अन्न नागरी पुरवठा विभागाकडून पाहणी करण्यात येईल. त्यानंतर या भागातील परवाने रद्द करण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी इंडियन एक्स्प्रेला दिली आहे.

या तीर्थक्षेत्राच्या अंतर्गत २२ वॉर्ड येतात. घाटी बहलराई, गोविंदनगर, मंडी रामदास, चौबियापाडा, द्वारिकापुरी, नवनीत नगर, बाणखंडी, भरतपूर गेट, अर्जुनपुरा, हनुमान टिला, जगन्नाथ पुरी, गौघाट, मनोहरपुरा, बैराजपुरा, राधानगर, बद्रीनगर, कृष्णानगर, कोयला गली, दंपियार नगर आणि जयसिंग पुरा या भागांचा समावेश आहे. साधूसंतांनी योगी सरकारच्या या निर्णयानंतर आनंद व्यक्त केला आहे.

भगवान श्रीकृष्णाचे मथुरा-वृंदावन हे जन्मस्थान आहे. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि पर्यटनाच्या दृष्टीकोनातून देखील महत्त्वपूर्ण आहे”, असे उत्तर प्रदेशच्या धार्मिक विभागाने अधिसूचनेत म्हटले आहे. एक पवित्र स्थान मानले जाते. देश आणि परदेशातून लाखो यात्रेकरू येथे भेट देतात.