अमृता फडणवीसांची साकीनाका बलात्कार प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया


मुंबई – महिलेवर बलात्कार करुन आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार मुंबईच्या साकीनाका परिसरात समोर आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात केले होते. पण आज उपचारांदरम्यान बलात्कार घटनेतील पीडितेचा मृत्यू झाला. आता सर्वच स्तरातून अत्यंत पाशवी अशा या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणाबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील संताप व्यक्त करत अशा नराधामांना सार्वजनिकरित्या फाशी द्यायला हवी, असे म्हटले आहे.

साकीनाका येथील खैरानी रोड परिसरातील या घटनेमुळे खळबळ माजली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ३२ वर्षांची असून कंट्रोल रुमला पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास साकीनाका येथे खैराना रोडवर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याचा फोन आला होता. पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पीडितेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचारांदरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे.

जखमांमुळे साकिनाका येथील बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणाप्रमाणे बलात्काऱ्याने तिच्या खाजगी भागात रॉड घातला होता. असे गुन्हेगार जिवंत का आहेत? ते आमच्या मुलींसाठी धोका आहेत. मला ठामपणे वाटते की या नराधमांना सार्वजनिकरित्या फाशी द्यावी!, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. साकीनाक्यात घडलेला प्रकार आणि त्यानंतर पीडितेचा मृत्यू मन सुन्न करणारा आहे. गेल्या महिन्याभराच्या काळात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच, या घटना मुंबईत असुरक्षिततेची भावना निर्माण करणाऱ्या असल्याचे देखील ते म्हणाले.