फेसबुकवर धनंजय मुंडे–करुणा शर्मा यांच्यासह राज्यातील बड्या नेत्यांबद्दल बदनामीकारक पोस्ट


पुणे – फेसबुकवर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, भाजपचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांबद्दल फेसबुकवर अश्लील मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात मॉडेल कॉलनी येथे राहणाऱ्या ज्ञानेश्वर बडे या तरुणाने फिर्याद दिली आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा समाजात तेढ निर्माण होईल, अशा प्रकाराच्या पोस्ट फेसबुकवर राहुल मुळे या तरुणाने केल्या आहेत. त्याच दरम्यान धनंजय मुंडे – करुणा शर्मा यांच्या नावाचा संदर्भ देऊन इतर महिलांच्या बाबतीत बदनामीकारक फोटो टाकण्यात आले आहेत.

तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, शिवसेना खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, अनिल देशमुख, अमृता फडणवीस, अमोल मिटकरी, रोहित पवार या नेत्यांबद्दल फेसबुकवर अश्लील मजकूर पोस्ट केल्याची तक्रार फिर्यादी ज्ञानेश्वर बडे यांनी राहुल मुळे यांच्या विरोधात दिली आहे. त्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.