संघ निवडीवरुन नाराज झालेल्या राशिद खानने सोडले अफगाणिस्तान क्रिक्रेट संघाचे कर्णधारपद


काबुल : तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तेथील क्रिकेटचे काय होणार असा प्रश्न उभा राहिला होता. पण त्यानंतर आता अफगाणिस्तान क्रिकेट टीममध्ये मोठा भूकंप झाला असून फिरकी गोलंदाज राशिद खानने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाची घोषणा केली. त्यानंतर लगेचच राशिद खानने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

राशिद खान अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने निवडलेल्या संघावर नाराज असून त्याने संघाची निवड करताना आपला सल्ला घेतला नसल्याचे म्हटले आहे. आपली नाराजी व्यक्त करताना राशिद खानने म्हटले आहे की, कर्णधार आणि देशाचा एक जबाबदार व्यक्ती म्हणून मला संघाच्या निवडीच्या हिस्सा बनण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण मला कोणताही सल्ला अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आणि निवड समितीने न विचारल्यामुळे मी तात्काळ प्रभावाने टी 20 क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे. अफगाणिस्तानच्या संघाचे नेतृत्व करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

राशिद खान संघ निवडीवरुन नाराज आहे, पण अद्याप हे स्पष्ट झाले नाही. राशिद खान टी-20 मधील जगातील तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. राशिद खानच्या राजीनाम्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आता संघाच्या कर्णधारपदी मोहम्मद नबी याची नियुक्ती केली आहे. आयसीसी टी 20 विश्वचषक सामने 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या दरम्यान संयुक्त अरब अमिरात आणि ओमनमध्ये आयोजित करण्यात आले आहेत.